थाटात शुभारंभ
गोव्याचा इफ्फी जागतिक आकर्षण ठरावा ः रेखा
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) ः गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील अन्य कोणत्याही चित्रपट महोत्सवाच्या तोडीसतोड आहे. त्यामुळे आगामी काळात हा महोत्सव साऱ्या जगाचे प्रमुख आकर्षण ठरेल, असे प्रतिपादन ३९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटक तथा सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी केले.
कला अकादमीच्या खचाखच भरलेल्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात ३९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज थाटात उद्घाटन झाले. प्रमुख पाहुण्या अभिनेत्री रेखा यांनी पारंपरिक दीपप्रज्वलनाने या सोहळ्याचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माहिती व प्रसारण तथा विदेश राज्यमंत्री आनंद शर्मा, माहिती व प्रसारण सचिव श्रीमती सुषमा सिंग, गोव्याचे मुख्य सचिव श्री. जे. पी. सिंग, महोत्सवाचे संचालक एस.एम. खान, महापौर टोनी रॉड्रिगीस आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे आकर्षण ठरलेली मूळ गोमंतकीय तेलगू अभिनेत्री इलियान डिक्रूझ हिने यावेळी रेखा यांची सोबत केली. अभिनेत्री अमृता राव यांनी आपल्या खास शैलीत उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
"गोवा हे आपले नेहमीच आवडीचे स्थळ ठरले आहे व भविष्यात याच भूमीत आपले घरही असेल" असे कौतुगोद्गार रेखा यांनी गोमंतभूमीबद्दल काढूनगोव्यावर स्तुतिसुमनांची बरसात केली. मंत्री आनंद शर्मा यांनी आपल्या भाषणात चित्रपट उद्योगाने देशाच्या सांस्कृतिक इतिहासात दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. केवळ मनोरंजनच नव्हे तर समाजाला योग्य दिशा देणे व संवेदनशील विषय हाताळताना सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याचे कामही चित्रपट उद्योगाने केले आहे. धार्मिक कलह किंवा दहशतवाद आदी विषय हाताळतानाही सामाजिक भान ठेवूनच या उद्योगाने कार्य केल्याचे ते म्हणाले. चित्रपट उद्योगाचा मूळ हेतू जरी मनोरंजन करणे असले तरी एक उद्योग या नात्याने व्यवसाय व रोजगारनिर्मिती ही या उद्योगाची प्रमुख प्राप्ती आहे. चित्रपट उद्योगाचे प्रमुख केंद्र भारत बनावा यासाठी प्रयत्न चालू असून या उद्योगातील लोकांनी केंद्र सरकारसमोर ठेवलेल्या मागण्या व अडचणी यांच्यावर लवकरच तोडगा काढू,असे अभिवचनही त्यांनी यानिमित्ताने दिले.
राज्यपाल एस. एस. सिद्धू यांनी चित्रपटांबद्दल आपले ज्ञान मर्यादित जरी असले तरी चांगल्या निर्मितीचा आनंद आपण लुटतो. आपल्याकडे संग्रह असलेल्या काही मोजक्या हिंदी चित्रपटांत रेखा यांनी अभिनय केलेल्या दोन चित्रपटांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले, चित्रपट उद्योगात अनेक गोमंतकीयांनी मोलाचे योगदान दिले आहे. गोव्यात चित्रपट संस्कृती रुजावी व त्यानिमित्ताने येथील निर्मात्यांना या उद्योगात प्रवेश करण्याची संधी मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. "इफ्फी'च्या आयोजनाबाबत मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांनी दिलेल्या सहकार्याची आठवण काढून त्यांची प्रकृती स्थिर होवो,अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली.
महोत्सवाचे संचालक श्री.खान यांनी स्वागत केले. श्रीमती सुषमा सिंग यांनीही आपले विचार प्रकट केले. महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभागाच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष पीटर हो सन चान तसेच इतर सदस्य मार्को म्युलर, निकी कारीमी, तब्बू, लाव दियाज यांची खास उपस्थिती होती. त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांची उपस्थितांना ओळख करून देण्यात आली.
या महोत्सवानिमित्त पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. आज दाखल झालेल्या पाहुण्यांत सचिन पिळगावकर, रणधीर कपूर,तब्बू, अमृता राव, इलिना डिक्रुझ यांच्यासह अनेक विदेशी अभिनेत्यांचाही समावेश होता. हॉंगकॉंगचे विख्यात दिग्दर्शक पीटर चॅन्स यांच्या " दी वॉरलॉर्डस" या चिनी चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली. या चित्रपटाने महोत्सवाचे रंग गहिरे करत नेले...
कडेकोट सुरक्षा
दरम्यान, "इफ्फी'च्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त कला अकादमी तसेच महोत्सवाच्या ठिकाणी कडेकोड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. "मेटल डिटेक्टर'द्वारे तपासणीशिवाय कोणालाच आत प्रवेश न देण्यात येत नव्हता. गोव्याबाहेरून आलेल्या काही प्रतिनिधींनी सुरूवातीस पोलिसांकडून तपासणी होत असल्याने उशीर होत असल्याचा आवाज सुरू करण्यात आला असता उर्वरीत लोकांनी पोलिसांच्या तपासणीचे समर्थन करून सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे असल्याने विनाकारण कोणत्याही विषयावरून गोंधळ न माजवण्याची तंबी देताच हे लोक आपोआप गप्प बसले.
Sunday, 23 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment