Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 27 November 2008

भोमच्या तरुणाचा प्रेमप्रकरणातून खून आमयावाडा-खांडोळा येथील घटना

माशेल, दि. २६ (प्रतिनिधी): बेतकी - खांडोळा पंचायत क्षेत्रातील आमयावाडा - खांडोळा येथे काल रात्री ९ ते १० या दरम्यान भोम येथील जल्मीवाड्यावर राहणाऱ्या होनू सोसो गावडे (३२) याचा लोखंडी नळीसदृश वस्तू डोक्यात हाणून खून करण्यात आला. या प्रकरणी आमयावाडा येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या शमिन बानू (४५) दादापीर शेख (२१), मेहबूबअली शेख (२०) यांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल मजदिस फरारी असून त्याचा शोध सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार होनू गावडे यांचे अब्दुल मजदिस व शमिन बानू यांच्या मुलीशी गेले सहा वर्षे प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटुंबीयांची त्यांच्या लग्नाला समंती होती; पण होनू गावडे यांच्या घरून व वाड्यावर लग्नाला तीव्र विरोध होता. लग्न आज उद्या करू यात सहा वर्षे गेली. मुलीचे कुटुंब या प्रेमसंबंधामुळे अस्वस्थ झाल्याने त्यांनी मुलीचे इतरत्र एका मुलाशी लग्न लावून दिले.
मुलीचे लग्न झाल्याचे समजताच होनू आपला मित्र, शैलेश सीताराम नाईक (तिवरे) याच्यासह मोटारसायकलने रात्री ८ च्या सुमारास आमयावाडा (वडाकडे) येथे मुलीच्या घरी आला. शैलेशला त्याने कुंपणाच्या फाटकापाशीे राहण्यास सांगून तो खोलीत गेला. त्यावेळी खोलीत मुलीचे वडील अब्दुल, आई शमिन, भाऊ दादापीर व मेहबूब उपस्थित होते. मुलीच्या मुद्यावरून होन व त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसान भांडणात झाले. दरम्यान, कोणीतरी होनूच्या डोक्यावर लोखंडी नळी मारल्याने होनू धडपडत खोलीबाहेर येऊन जमिनीवर पडला व तेथेच गतप्राण झाला. त्याचवेळी त्याने जीवाच्या आकांताने मारलेली किंकाळी कुंपणाच्या फाटाकापाशी उभ्या असलेल्या शैलशने ऐकली व तो धावत आत आला तेव्हा त्याला होनू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
शैलेशने तात्काळ माशेल पोलिस चौकीवर धाव घेऊन याप्रकरणी तक्रार नोंदविली. तसेच १०० क्रमांकावर फोन करून माहिती दिली. रात्री १० वाजता फोंड्याचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई व त्यांचे सहकारी १०८ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले असता रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी होनूचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यावेळी खोलीत असलेल्या तिघांनाही अटक करू होनूचा मृतदेह पोलिसांनी चिकित्सेलाठी "गोमेकॉ' इस्पितळात पाठवून दिला.
मंजुनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी बेतकी खांडोळा व अडकोण भोमचे सरपंच, अनुक्रमे संजय नाईक व सुनील जल्मी यांच्यासमोर पंचानामा करण्यात आला. होनूच्या डोक्यात हाणलेले हत्यार मिळाले नाही. यावेळी बेतकी खांडोळाचे पंच नोनू नाईक व दिलीप नाईक उपस्थित होते. मंजुनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

No comments: