Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 26 November 2008

आज मतदान मगोची मते निर्णायक ठरणार

पणजी, दि. २५ (किशोर नाईक गावकर): तमाम गोवेकरांचे लक्ष लागलेल्या पाळी पोटनिवडणुकीसाठी उद्या २६ रोजी मतदान होणार आहे. आमदार स्व.गुरूदास गावस यांच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत असली तरी त्यानिमित्ताने विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारची विश्वासाहर्ता पणाला लागली आहे. कॉंग्रेस, भाजप व अपक्ष अशी तिरंगी लढत या ठिकाणी होईल. मात्र महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा "सिंह' प्रथमच मतपत्रिकेवरून गायब झाल्याने स्वाभिमानी मगोप्रेमी मतदार कोणाच्या बाजूने उभा राहतो यावरच पाळीतील भावी लोकप्रतिनिधीचे भवितव्य ठरणार आहे.
विकासाच्या बाबतीत विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आत्तापर्यंत मगोनंतर सर्वांत जास्त काळ सत्तेवर राहिलेल्या कॉंग्रेसकडून या मतदारसंघावर नेहमीच अन्याय झाला, त्यामुळे विकासाचा पोकळ "फॉर्म्युला' त्यांच्या कामी येणार नाही. याची जाणीव झालेल्या कॉंग्रेसने स्व.गावस यांचे बंधू प्रताप गावस यांना उमेदवारी दिली. स्व.गावस यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रताप गावस यांना निवडून देण्याचे भावनात्मक आवाहन करण्याचे कॉंग्रेसचे प्रयत्न कितपत यशस्वी होतात, हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे, भाजपने डॉ.आमोणकर यांना उमेदवारी नाकारून धाडसी निर्णय घेतला आहे. भाजप सरकारात मंत्री राहूनही गेल्या विधानसभा निवडणूकीत घसरण झालेल्या डॉ.आमोणकर यांची लोकप्रियता घटल्याचे सिद्ध झाल्याने व पक्षांतर्गत डॉ.आमोणकर यांच्याबाबत नकारार्थी वातावरण पसरल्याने पक्षाचे युवा कार्यकर्ते डॉ.प्रमोद सावंत यांना भाजपची उमेदवारी मिळाली. समाजकार्याची ओढ असलेला हा उमदा युवक विविध उपक्रमांच्या निमित्ताने या मतदारसंघात परिचित आहेच. त्यातच आता भाजपची उमेदवारी मिळाल्याने ते सर्वांना आणखी परिचयाचे झाले आहेत. डॉ.आमोणकर यांनी बंड करून अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने डॉ.सावंत यांना काहीप्रमाणात फटका बसेलही परंतु व्यक्तीनिष्ठेपक्षा पक्षनिष्ठेला महत्व देणारा भाजप मतदार पक्षापासून फारकत घेणे कठीण असल्याने डॉ.आमोणकर यांचा कितपत निभाव लागेल, हे सांगणे कठीणच. गेल्या विधानसभेत मगोपक्षाशी प्रामाणिक राहीलेला सुमारे ४०३२ मतदारांचा प्रभावी आकडा कोणाच्या मतपेटीत जमा होतो यावरच विजयी उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.१९९९ व २००२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा मतदार भाजपकडे वळला होता. तथापि, २००७ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत हा मतदार पुन्हा मगोकडे वळला. गेल्यावेळी मगोचे उमेदवार महेश गावस यांनी ४०३२ मते मिळवली होती. स्व. गावस यांना ७७६८ व भाजपचे डॉ.आमोणकर यांना ६१७७ मते मिळाली होती. स्व.गावस हे केवळ १५९१ मताधिक्यांनी निवडून आले होते.
यावेळी पाळीतील मतदारांची संख्या २२७३० आहे. राज्य सरकारने केवळ पाळी मतदारसंघापूर्ती सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने या मतदारसंघाबाहेर काम करणारे बहुसंख्य मतदार आपला मतदानाचा हक्क किती उत्साहाने बजावतात हाही मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. एकूण ३० मतदानकेंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्यातील ११ मतदानकेंद्रे संवेदनशील आहेत. १९६३ पासून आत्तापर्यंत सात वेळा या मतदारसंघात मगो पक्षाचा आमदार निवडून आला आहे.१९८४ साली पहिल्यांदा कॉंग्रेसतर्फे विनयकुमार उसगावकर निवडून आले होते.१९९९ साली या मतदारसंघात भाजपने आपला झेंडा रोवला व २००२ सालीही डॉ.आमोणकर यांनी बाजी मारली.२००७ सालच्या निवडणूकीत मात्र डॉ.आमोणकर यांना जनतेने नाकारले व हा मतदारसंघ पुन्हा कॉंग्रेसच्या पदरात पडला. डॉ.आमोणकर यांच्या पराजयाला मगोचे उमेदवार महेश गावस कारणीभूत ठरले. मगो पक्षाचे सध्याचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी यावेळी पाळी मतदारसंघात प्रत्यक्ष कॉंग्रेससाठी काम करणे टाळले आहे याचीही येथे दखल घ्यावी लागेल. दोन दिवसांपूर्वी महेश गावस व त्यांच्या पत्नी तथा पाळीच्या सरपंच शुभेच्छा गांवस यांनी कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप गांवस यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. मगोचे पारंपारिक मतदार हे कॉंग्रेसविरोधकच आहेत, त्यामुळे "हात' या चिन्हावर ते मतदान करण्याची शक्यता अल्पच. त्यामुळे महेश गावस यांच्या नावावर मगोची किती मते कॉंग्रेसच्या झोळीत पडतात, हा उत्सुकतेचा मुद्दा ठरावा.
स्व. गुरूदास गावस यांची आमदारकीच्या कारकिर्दीत कॉंग्रेसकडून झालेली फरफट तसेच त्यांनी आपल्याच पक्ष नेतृत्वाबाबत जाहीरपणे व्यक्त केलेली टीका पाहता पाळी मतदारसंघाच्या विकासाच्या बाता जनता कितपत मान्य करून घेते हेही लवकरच स्पष्ट होणार आहे. पाळीसाठी सुमारे १५० कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करून विकासाच्या कल्पनांचे मायाजाल कॉंग्रेसने जाहीर प्रचारात पसरवण्याचा जो प्रयत्न केला त्याला किती मतदार भुलले हे निकालानंतर स्पष्ट होईल. कॉंग्रेस आघाडी सरकारातील अंतर्गत कलहामुळे राज्याची मोठ्या प्रमाणात फरफट सुरू असून लोक वारंवार रस्त्यावर उतरत आहेत. मुळातच आपल्या अवतीभोवती सुरू असलेल्या या घटनांचा पाळी मतदारांवर किती परिणाम झाला किंवा केवळ मतदारसंघापुरता विचार न करता संपूर्ण राज्याच्या भवितव्याचे चिंता कोणाला लागली आहे हे निकालाअंतीच सिद्ध होईल. भाजप,कॉंग्रेस,अपक्ष वगळता सेव्ह गोवा फ्रंट पक्षाचे उमेदवार जुझे लोबो रिंगणात आहेत. ते किती मते मिळवणार हा भाग वेगळा; तथापि, त्यांनी डॉ.आमोणकर यांच्याविरोधात अतिरीक्त संपत्तीबाबत तक्रार दाखल करून आपला दबदबा निर्माण केला आहे.

No comments: