Tuesday, 25 November 2008
मूर्तिभंजनाचे बावीसावे प्रकरण
कुडचडे येथे मोडतोड करण्यात आलेली सांडिलेश्वर बाबाची मूर्ती आणि त्रिशूळ.(छाया: अमर नाईक)
कुडचडे, दि. २४ (प्रतिनिधी): राज्यात मूर्तिभंजनाचे सुरूच असून रविवारी रात्री २.३० च्या सुमारास कुडचडे रेल्वे स्थानकाजवळ भरवस्तीत असलेल्या सांडिलेश्वर बाबाच्या मूर्तीची तोडफोड करण्याचा प्रकार घडल्याने या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घुमटी आणि त्रिशूल मोडण्यात आवा असून व पिंपळाच्या पेडावर असलेले शिवलिंग मोडून टाकण्यात आले आहे. त्यामुळे लोकांतून आणि हिंदू संघटनांतून याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
रेल्वेमंडळाच्या हद्दीत असलेल्या क्वॉर्टसपासून १ मीटर आत असलेल्या तसेच बाजाराच्या मुख्य वस्तीसमोरच असलेल्या पिंपळाचा पेड भागात दाट वस्ती आहे.काल रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडल्याचे रेल्वे सुरक्षा रक्षक प्रसाद पाब्वसिनकर यांनी पाहिल्याचे सांगण्यात आले. यावेळी सदर सुरक्षा रक्षकाच्या म्हणण्यानुसार रात्री ड्युटीवर असताना रेल्वे स्टेशन भागात सात ते आठ अज्ञात इसम सदर देवस्थानाच्या ठिकाणी फिरत असल्याचे दृष्टीस पडले होते. काही वेळाने तेथे आवाज आला; पण सुमारे दोनशे मीटर आपण दूर असल्याचे त्यांची ओळख पटविणे कठीण झाले. त्यानंतर आपण आपल्या एका साथीदारासह घटनास्थळी दाखल झालो असता अज्ञातांनी पळ काढल्याचे त्यांनी सांगितले.
सदर रक्षकाने याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना आज सकाळी ८ वाजता रेल्वे अधिकाऱ्यांना दिली.
दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक ऍलन डिसा, मडगावचे पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर केपे उपअधीक्षक रोहिदास पत्रे, कुडचडे पोलिस निरीक्षक नीलेश राणे, केपे पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची गती वाढवली. यावेळी "मीना' हे श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांची मदत घेण्यात आली. तथापि, त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
स्थानिक आमदार श्याम सातार्डेकर यांनी घटनास्थळी जाऊन या घटनेची पाहणी केली. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. ही कृती भ्याडपणाची असून गोव्यातील जातीय सलोखा नष्ट करण्याचा हेतू त्यामागे दिसतो. पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांना ताबडतोब शोधून त्यांच्या मुसक्या बांधाव्यात, असे त्यांनी सांगितले.
सावर्डे जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप सावंत देसाई, कुडचडे नगरसेवक - देऊ सोनू नाईक, मारुती नाईक, गोवा शिवसेनेचे उपराज्य प्रमुख नामदेव नाईक, पद्मनाथ शिष्य सांप्रदायाचे सुदेश खुशाली नाईक व इतर लोक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------------------------
मूर्तिभंजनाचे बावीसावे प्रकरण
राज्यातील मूर्तितोडफोडीचे हे बावीसावे, तर कुडचडे भागातील चौथे प्रकरण आहे. पोलिसांना यातील एकाचाही तपास लावण्यात यश न आल्याने हिंदू संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
राज्यात मूर्तितोडफोडीचे प्रकार सर्रास सुरू असूनही सरकारला त्यात लक्ष घालायला वेळ नाही. मंदिरांच्या सुरक्षेचे काम बेरोजगार युवकांकडे सोपवावे, अशी मागणी शिवसेनेचे नामदेव नाईक यांनी केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment