मधू चव्हाण यांचे पाळीवासीयांना आवाहन
पाळी, दि. २३ (प्रतिनिधी) - ग्रामपंचायत स्तरापासून ते लोकसभेपर्यंत कॉंग्रेसला खड्याप्रमाणे वेचून काढून बाहेर फेकण्याची वेळ आज आली आहे, कारण माणसाच्या ह्रदयात देवत्व जागविण्याच्या कर्तव्याकडे पाठ फिरवून त्यांनी माणसाच्या ह्रदयात सैतान जागविण्याचे आजपर्यंत कर्म केले आहे. खून, बलात्कार, तोडफोड, चोऱ्या, दरोडे यासारखी दुष्कृत्ये होऊनही काहीच न झाल्यासारखे वावरणाऱ्या कॉंग्रेसी नराधमांना ठेचून काढण्याची गरज आहे. जनतेच्या भावनांची कल्पना नसलेल्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा काहीच अधिकार नाही, असे उद्गार महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस मधू चव्हाण यांनी साखळी येथे जाहीर सभेत काढले.
उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित साखळी येथील सभेत चव्हाण प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक, मनोहर पर्रीकर, अल्पसंख्याक मोर्चाचे इब्राहिम मुसा, शिवसेनेचे सुभाष सावंत, उपेंद्र गावकर, नामदेव नाईक, कुंदा चोडणकर, शुभदा सावईकर, सुभाष मळीक व अन्य उपस्थित होते.
गोव्याच्या भूमीला कॉंग्रेसचे काळे पाय लागल्यापासून गोव्याची अधोगती सुरू आहे, या पक्षाने तरुणाईला लाचार बनविले आहे तर महिलांचे अस्तित्वच नाहीसे केले आहे, अशा राज्यकर्त्यांना तडीपार करण्याची वेळ आली आहे, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. ज्या सरकारमधील मंत्री व आमदार एकमेकांविरुद्ध आरोप करीत आहेत, असे स्वार्थी सत्ताधारी गोव्याचा विकास कसा करतील, असा प्रश्न मनोहर पर्रीकर यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री कसा असावा याचे उत्तम उदाहरण मनोहर पर्रीकर यांच्या रुपाने आपल्यासमोर आहे, त्यांनी गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रासमोरही चांगल्या कामगिरीने उदाहरण ठेवले आहे, असे सुभाष सावंत यांनी सांगितले.
गोव्यात चाललेली बजबजपुरी संपविण्याची संधी पाळीवासीयांना २६ रोजी मिळाली आहे, त्याचा उपयोग करून सरकार खाली खेचा, असे आवाहन उपेंद्र गावकर यांनी यावेळी केले. विजय पै खोत, लक्ष्मीकांत पार्सेकर, इब्राहिम मुसा, दामोदर नाईक, फ्रांसिस डिसोझा यांचीही यावेळी भाषणे झाली. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना आपण समाजसेवेत कधीही मागे पडणार नसल्याची ग्वाही दिली. दामू घाडी, प्रदीप अवखळे, प्रवीण सावळ, सुभाष सावळ, उपेंद्र कर्पे, शाबल परब, सिद्धेश काणेकर आदी कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. संतोष भगत यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष भणगे यांनी आभार मानले.
Monday, 24 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment