Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 24 November 2008

आज प्रचाराची समाप्ती

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणूक प्रचाराची रणधुमाळी उद्या (सोमवारी) ५ वाजता संपणार असून मतदान संपेपर्यंत पुढील अठ्ठेचाळीस तास पाळी मतदारसंघात स्वरूपाचा छुपा प्रचार करता येणार नाही, अशी सक्त ताकीद निवडणूक आयोगाने दिली आहे. उद्या संध्याकाळी ५ वाजल्यापासून मतदार कार्डे वितरण किंवा घरोघरी फिरणे आदी प्रकारांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. पाळी मतदारसंघाबाहेरील कोणत्याही राजकीय नेत्यांना किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांना या मतदारसंघात प्रवेश करता येणार नाही व त्यासाठी मतदारसंघात प्रवेश करण्यासाठी असलेल्या चार प्रमुख मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी अरविंद बुगडे यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग खपवून घेतला जाणार नसल्याचे सक्त आदेश जारी केले आहेत. मोबाईलवरील प्रचारालाही या काळात बंदी असून आयोगाकडे किंवा निवडणूक निरीक्षकांकडे तशा तक्रारी आल्यास गुन्हा नोंद करून घेणे भाग पडणार असल्याची तंबीही श्री. बुगडे यांनी दिली. मतदानासाठी ओळखपत्र सक्तीचे करण्यात आल्याने ओळखपत्र नसलेल्या मतदारांसाठी उद्या शेवटची संधी असेल.उद्या २४ रोजी डिचोली नगरपालिका सभागृह व बाये-सुर्ला येथे ओळखपत्र वितरणाची खास सोय करण्यात आली आहे. मतदानाच्या हक्कापासून कोणीही वंचित राहू नये,यासाठी ही खास सोय करण्यात आली आहे. डिचोली येथे ओळखपत्र वितरण केंद्र फक्त दुपारपर्यंत सुरू असेल; तर बाये-सुर्ला येथे पूर्ण दिवस मतदार ओळखपत्र वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारयादीत नावे असताना ओळखपत्र नसलेल्या मतदारांनी तात्काळ या केंद्रात जाऊन ओळखपत्र बनवून घ्यावे, असे आवाहन बुगडे यांनी केले आहे.
डॉ. आमोणकरांच्या अतिरिक्त मालमत्तेचे पुरावे आज सादर करणार
दरम्यान, "सेव्ह गोवा फ्रंट'चे पाळी पोटनिवडणूक उमेदवार जुझे लोबो यांनी अपक्ष उमेदवार डॉ.सुरेश आमोणकर यांच्या विरोधात मालमत्ता प्रतिज्ञापत्रावरून दाखल केलेल्या तक्रारीसंबंधीचे पुरावे उद्या २४ रोजी सादर केले जातील,अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष आंतोन गावकर यांनी दिली. डॉ.आमोणकर यांनी स्वतःच्या संपत्तीबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खरी माहिती दिली नसल्याची तक्रार श्री.लोबो यांनी केली आहे. या प्रतिज्ञापत्रात सुमारे ५० लाख रुपयांच्या मालमत्तेबाबत कोणतीच माहिती नसल्याने त्यांची उमेदवारी रद्दबातल करण्यात यावी,अशी मागणीही करण्यात आली आहे.

No comments: