नवी दिल्ली, दि. २५ : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली आलेल्या आहेत हे लक्षात घेऊन सध्या सहा राज्यांत सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर म्हणजे येत्या २४ डिसेंबरनंतर पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्यावर विचार केला जाईल, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरलीदेवरा यांनी आज म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या आहेत. त्याकडे बघता आता आम्हीही देशांतर्गत कच्च्या तेलाच्या किमती कमी केल्या पाहिजेत परंतु २४ डिसेंबरपूर्वी आम्ही त्या कमी करू शकत नाही. कारण सध्या काही राज्यांत निवडणुका सुरू आहेत व तेथे निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने व तेथील निवडणूक प्रक्रिया २४ डिसंेंबरपूर्वी पूर्ण होत नसल्याने अशाप्रकारची घोषणा आम्ही करू शकत नाही, असेही देवरा यांनी येथे पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, पेट्रोलियम सचिव आर. एस. पांडे यांनी म्हटले आहे की, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याचा प्रस्ताव डिसेंबरच्या अखेरीस केंद्रीय मंत्रिमंडळासमोर पाठविण्याचा आमच्या मंत्रालयाचा विचार आहे.
हा आचारसंहितेचा भंग
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल व डिझेलच्या किमतीत कपात करण्याचे पेट्रोलियममंत्री मुरली देवरा यांनी घोषित करणे म्हणजे हा सरळसरळ निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे, असे भाजपने म्हटले आहे. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू असेही भाजपने म्हटले आहे.
मुरली देवरा यांची घोषणा म्हणजे सध्या सहा राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू असल्याने तेथील मतदाराला खूष करण्यासाठी व आपल्या बाजूने त्याचे मत प्राप्त करण्यासाठी करण्यात आलेला प्रयत्न आहे, असे दिल्ली विधानसभेसाठीचे भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार विजयकुमार मल्होत्रा यांनी म्हटले आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करू असेही ते पुढे म्हणाले.
Wednesday, 26 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment