यंदाही पहिले तिन्ही क्रमांक मुलींनीच पटकावले
पणजी, दि. १ (सांस्कृतिक प्रतिनिधी) - सम्राट क्लब इंटरनॅशनलने आयोजिलेल्या "सम्राट संगीत सितारा' या भव्य स्पर्धेत यंदाही मुलींनीच निर्विवाद वर्चस्व राखले. कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात आज पार पडलेल्या अंतिम फेरीत प्राची जठार "सम्राट संगीत सितारा' ठरली. तिला दहा हजार रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
दुसरा क्रमांक सिद्धी शेलारने तर तिसरा क्रमांक स्वानंदी कुलकर्णी हिने पटकावला. सिद्धीला ५००० रुपये, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र व स्वानंदीला ३००० रुपये, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रख्यात गायक शौनक अभिषेकी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी उद्योगपती विश्वासराव धेंपे, ंमहेश नाईक, सच्चित पै, रामा गावस, संतोष फोंडेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
शौनक अभिषेकी म्हणाले, सम्राट क्लबशी आमचे नाते बाबा म्हणजेच माझे वडील स्व. जितेंद्र अभिषेकी यांच्या काळापासून आहे. सम्राट क्लबने राबवलेला हा उपक्रम नवोदित गायकांना प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे ही संस्था अभिनंदनास पात्र आहे.
दिमाखात सुरू झालेल्या अंतिम फेरीने उपस्थित रसिकांना भरपूर आनंद दिला. अंतिम फेरीतील स्पर्धक विश्वजित मेस्त्री यांनी राग गोरख कल्याण आळवला, तर आकाश पंडित यांनी राग मालकंस सादर केला. विजेत्या प्राची जठारने राग बागेश्री सादर केला. तसेच दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील स्वानंदी कुलकर्णी आणि सिद्धी शेलार यांनी राग बागेश्री व राग बिहाग सादर केला. त्यांना तबल्यावर दयेश कोसंबे आणि हार्मोनियमवर सुभाष फातर्पेकर यांनी साथ केली.
२६ जूनपासून विविध केंद्रांवर सुरू झालेल्या या स्पर्धेत एकूण ७६ स्पर्धकांनी भाग घेतला. त्यातील २८ स्पर्धकांची "स्वरमयी' आणि "सुरमयी' गटासाठी निवड करण्यात आली होती. या दोन्ही गटातून सहा स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले होते.
अंतिम फेरीसाठी पं. सुधाकर करंदीकर, श्रीधर कुलकर्णी, आणि प्रचला आमोणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अंतिम फेरीच्या कार्यक्रमानंतर समीक्षा भोबे आणि शौनक अभिषेकी यांच्या सुरेल गायनाचा कार्यक्रम झाला. त्यास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
Monday, 2 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment