खास योजना हाती घेणार - डॉ. शेखर साळकर
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी)- दक्षिण गोव्यात काणकोण तालुक्यातील मूत्रपिंड निकामी होण्याच्या वाढत्या प्रकरणांची गंभीर दखल घेत या संकटाच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेण्याची तयारी राज्यातील काही होतकरू डॉक्टरांनी सुरू केली आहे. या तालुक्यातील सुमारे ४४ हजार लोकांच्या लघवीचे नमुने गोळा केले जाणार आहे. या नमुन्यांवर संशोधन करून मूत्रपिंड विकारांवरील नेमकी कारणे शोधून काढण्याची योजनाही या डॉक्टरांनी आखली आहे.
भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (इंडियन मेडिकल असोसिएशन) गोवा विभागाचे अध्यक्ष डॉ.शेखर साळकर यांनी ही माहिती दिली. दहा वर्षांखालील मुले वगळता काणकोण तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या लघवीचे नमुने गोळा करून त्यांची तात्काळ चाचणी करण्याची मोहीम येत्या १५ ऑगस्टपासून सुरू केली जाणार आहे. हे नमुने तपासल्यानंतर संभावित रुग्णांची माहिती मिळेल. या संभावितांच्या रक्ताची चाचणी करून लगेच उपचार सुरू केले जातील, असे डॉ. साळकर म्हणाले.
डॉक्टरांच्या या पथकाला निमवैद्यकीय कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व स्वयंसेवक साहाय्य करणार आहेत. हा कार्यक्रम आरोग्य सेवा संचालनालय व मणिपाल हॉस्पिटल समूह यांच्या मदतीने हाती घेतला जाणार आहे. काणकोण तालुक्यातील लोकांत मूत्रपिंड विकाराचे प्रमाण जास्त असल्याचे गेल्या कित्येक दशकांपासून आढळून आले आहे. यामागील नेमकी कारणे शोधून काढण्यासाठी आतापर्यंत कोणतीही योजना आखण्यात आलेली नव्हती. गोमेकॉत मूत्रपिंड विकारावरील उपचारांसाठी दाखल होणारे ८० टक्के रुग्ण काणकोण परिसरातील असल्याचेही आढळून आले आहे. पागी व वेळीप समाजातीलच बहुतांश लोकांत या विकाराचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने या मोहिमेअंतर्गत या समाजातील लोकांवर अधिक प्रमाणात लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सरकारकडील नोंदणीप्रमाणे काणकोण तालुक्यात मूत्रपिंडाची व्याधी जडलेले ३९४ रुग्ण आहेत. त्यातील ९४ नियमित पद्धतीने सरकारी इस्पितळात "डायलेसिस' उपचार घेतात. काणकोण ग्रामीण आरोग्य केंद्रात २००३ सालापासून २५ हजार "डायलेसिस'करण्यात आल्याचा दाखलाही खात्याकडे उपलब्ध आहे.
दरम्यान, बहुतांश लोकांना मूत्रपिंडाची व्याधी झाल्याचे उशिरा लक्षात येत असल्याने उपचार करणे कठीण बनते. ही मोहीम राबवल्यानंतर किमान अशा संशयित रुग्णांची माहिती मिळू शकेल. त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू केल्यास त्यांना या संकटापासून मुक्ती मिळू शकेल, असे मत डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केले.
Sunday, 1 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment