इंग्रजी भाषेमुळे सांस्कृतिक "बोन्सायीकरण'
पणजी, दि. ३१ (सांस्कृतिक प्रतिनिधी)- मांडवीच्या तीरावर दिमाखात उभ्या असलेल्या कला अकादमीच्या भव्य वास्तूत आज एका भरजरी सोहळ्यात ज्येष्ठ गोमंतकीय साहित्यिक रवींद्र केळेकर यांना साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च बहुमानाचा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आणि सांस्कृतिक श्रीमंतीत न्हालेल्या संध्याकाळी हे दृश्य पाहून रवींद्रबाब यांचे चाहते अतीव आनंदाने गहिवरले..
लोकसभेच्या सभापती श्रीमती मीराकुमार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र, प्रमाणपत्र, वाङ्देवीची मूर्ती आणि ७ लाख रुपयांचा धनादेश अशा स्वरूपाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा टाळ्यांच्या गजराने कला अकादमीचा परिसर दुमदुमला.
इंग्रजी भाषेचा देशी भाषेत शिरकाव झाल्याने सांस्कृतिक"बोन्सायीकरण' झाले आहे. आज इंग्रजी भाषेने आपल्या देशात बोन्साय लेखक, विद्वान, विचारवंत आणि बोन्साय विद्यार्थी निर्माण केले आहेत. बोन्साय विद्वान देशाच्या विकासासाठी ठोस असे काहीच देऊ शकत नाहीत. ते केवळ परिसंवादाची शोभा वाढवू शकतात, अशी खंत श्री. केळेकर यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली. कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. केळेकर यांच्या भाषणाचे वाचन नमवरसिंग यांनी केले.
यावेळी ज्ञानपीठ विजेते रवींद्र केळेकर, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तथा लोकसभेच्या सभापती श्रीमती मीराकुमार, मुख्यमंत्री दिगंबर कामत, भारतीय ज्ञानपीठाचे संचालक रवींद्र कालिया आणि ज्ञानपीठ पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. सीताकांत महापात्र व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. केळेकर म्हणाले की, भारतीय साहित्य एका धाग्यात गुंफले गेले आहे; मग ते कुठल्या भाषेतील असो. म्हणूनच आपण कुठल्याही भाषेत लिहिले तरी आपण त्या भाषेचे लेखक नसून आपण भारतीय लेखक आहोत. मात्र आज हे साहित्य वाचणारे किती लोक आहेत असा सवाल करून त्यांनी आपल्या पुस्तकांची उदाहरणे दिली. कारण आपल्या देशात न्यायदान इंग्रजीतून, राज्यकारभार इंग्रजीतून , कायदे इंग्रजीतून केले जातात. एवढेच नव्हे तर मोठमोठ्या नोकऱ्यासुद्धा इंग्रजी शिकलेल्यांनाच दिल्या जातात. या स्थितीत मातृभाषेचे कितीही गोडवे गायले तरी काहीही साध्य होणार नाही.आमच्या भाषेतील साहित्य कुणीही वाचणार नाही. आज आम्ही कितीही इंग्रजी होण्याचा प्रयत्न केला तरी ते होणे अशक्य आहे. साहजिकच "ना घर का ना घाट का' अशीच परिस्थिती होणार. म्हणूनच बोन्साय देश होण्यावाचून वाचवण्याकरिता इंग्रजीच्या विरोधात विद्रोह करणे नितांत गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना सादर करून पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले. रवींद्र कालिया यांनी स्वागतपर भाषण केले.
यावेळी श्रीमती मीराकुमार म्हणाल्या, गोवा केवळ भारतातच नव्हे तर निसर्गसौंदर्यामुळे जगातही प्रसिद्ध आहे आणि अशा या जगप्रसिद्ध राज्यात हा सोहळा आयोजित केल्याने या सोहळ्याचे महत्त्व द्विगुणित झाले आहे.या राज्याचे सुपुत्र श्री. केळेकर यांच्यासारख्या साहित्याच्या उपासकाला भारताच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार माझ्या हस्ते प्रदान करण्याची संधी मिळाल्याने हा माझाही गौरव आहे.
भाषणात त्यांनी अनेक वेळा कोकणीचा वापर करून गोवेकरांना वेगळाच आनंद दिला. आपला देश सर्वच क्षेत्रात श्रीमंत असून साहित्य आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपली भाषा ही आपली ओळख आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या भाषेचा आपल्या लेखनातून प्रसार करणाऱ्या लेखकांना आपण या विस्मृतीच्या पडद्याआड ढकलतो. अन्य राष्ट्रांत त्या लेखकांच्या पश्चात त्यांच्या घरांची जपणूक करून त्यांनी केलेल्या कार्याची आठवण ताजी ठेवली जाते. आपल्याकडे मात्र वेगळाच प्रकार आहे असे सांगताना त्यांनी शेक्सपिअर आणि टॉलस्टॉयचे उदाहरण दिले. आधुनिक युगात अनेक दृश्य माध्यमामुळे वाचनाचे प्रमाण कमी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले, प्रत्येक गोवेकाराला अभिमान वाटणारा आजचा दिवस आहे. केळेकरांनी केलेल्या साहित्यसाधनेचेच हे फळ आहे.
ध्येयपूर्तीसाठी पुढे सरसावलेला माणूस कोणत्याही पुरस्काराची किंवा मानाची अपेक्षा बाळगत नाही. त्यातलेच एक म्हणजे श्री. केळेकर. त्यांनी अनेक समस्यांना तोंड दिले; पण आपल्या ध्येयापासून ते केव्हाच मागे हटले नाहीत.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संध्याकाळी मेकानीझ पॅलेस येथे "लेखकांशी संवाद' अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री सीताकांत महाप्रताप, नमवरसिंग आणि रवींद्र कालिया व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चासत्रात एखादी प्रादेशिक भाषा बोलणारे लोक किती आहेत हे पाहण्यापेक्षा त्या भाषेतील साहित्य कोणत्या दर्जाचे आहे या वरून भाषेचे मूल्य ठरते असे नमवर सिंग यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, आज प्रत्येक विद्यापीठात किमान एक तरी अनुवाद विभाग आणि भारतीय साहित्या तौलनिक विभाग असणे गरजेचे आहे.अनेक माध्यमे उपलब्ध असतानाही साहित्याचा म्हणावा तसा प्रसार होेत नाही; परंतु पूर्वीच्या काळात कोणतेही माध्यम नसताना संत साहित्याचा प्रसार होत होता. याचे कारण म्हणजे त्यांच्या साहित्याचा दर्जा.
दामोदर मावजो यांनी प्रास्ताविक केले आणि त्यांनीच कार्यक्रमाची सांगता केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment