म्हापसा, दि. ३ (प्रतिनिधी): शेट्येवाडा येथील चामर्स रेसिडन्सीमध्ये भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या आल्बर्ट लुईस (७०) यांच्या कानफटीत गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. सदर घटना आज सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान घडली.
याबाबत उपअधीक्षक सॅमी तावारिस यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सेंट झेव्हियर उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीत शिकणारी आल्बर्ट यांची मुलगी रश्मी लुईस घरी परतली असा तिला घराचे दार उघडे दिसले तर आत तिचे वडील खाटेवर झोपलेले आढळले. वडिलांना उठवण्याचे प्रयत्न फोल ठरल्याने दीड वाजता १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी म्हापसा पोलिसांना माहिती दिल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. आल्बर्ट यांच्या कानाजवळ गोळी झाडण्यात आल्याचे तसेच ते झोपलेल्या उशीतून ती गोळी आरपार झाल्याचे निशाण पोलिसांना आढळून आले. घटनेचा पंचनामा करून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. आल्बर्ट यांचा खून कोणी व का केला? याचे कोणतेच धागेदोरे पोलिसांनी मिळालेले नसले तरी लवकरच संशयिताला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आल्बर्ट लुईस आणि त्यांची मुलगी रश्मी दोन वर्षांपासून शेट्येवाडा म्हापसा येथील साव्हियो क्लेमेंट डिसोझा यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. आल्बर्ट हे सेंट मेरी हायस्कूलचे माजी शिक्षक असून दोन वर्षांपूर्वी ते अन्य एका ठिकाणी भाड्याने राहत होते. माजी शिक्षक तसेच शिकवणी वर्ग घेणारे आल्बर्ट लुईस मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असल्याने अनेकांचे त्यांच्या घरी येणे होते पण कोणाशी वाईट संबंध नव्हते, अशी चर्चा यावेळी सुरू होती.
Wednesday, 4 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment