Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 5 August 2010

सडा तुरुंगातून ३ कैद्यांचे पलायन

हिटलर तिसऱ्यांदा पळाला
वास्को, दि. ४ (प्रतिनिधी): विविध कारणांसाठी चर्चेत असलेल्या सडा उप कारागृहातून तीन कैद्यांनी आज (दि ४) पहाटे पलायन केल्याने पोलिस तसेच सडा उप कारागृहाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. कारागृहाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कोठडी क्र. १३ मध्ये खून प्रकरणी शिक्षा भोगत असलेला हिटलर फर्नांडिस, हल्लीच मडगाव येथे भर दिवसा खून प्रकरणातील अभिजित बाबासाहेब पाटील व मायणा कुडतरी येथील चोरी प्रकरणातील सेबी फेर्रांव यांनी शौचालयाच्या भिंतीला भगदाड पाडून कोठडीतून पळ काढला. नादिया तोरादो मृत्युप्रकरणी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मिकी पाशेको यांना याच सडा उप कारागृहात ठेवण्यात आले होते, न्यायालयाने मुक्तता केल्यानंतर विधानसभेत येऊन त्यांनी येथील विविध किस्से व कारनामे उघड केले होते हे विशेष!
आज पहाटे ३.३० च्या सुमारास सडा उप कारागृहाच्या कोठडी क्रमांक १३ बाहेरील रक्षकाने आत झाकून पाहिले असता १८ पैकी केवळ १५ कैदी उपस्थित असल्याचे दिसून आले. हिटलर फर्नांडिस (४३), अभिजित पाटील (२७) व सेबी फर्नांडिस (२०) या तिघांनी कोठडीतील शौचालयाच्या भिंतीला भगदाड पाडून बाहेर पडून नंतर कुंपणावरून उडी मारून पळ काढल्याचे यावेळी स्पष्ट झाले. फरार झालेल्या तिन्ही कैद्यांचा सुमारे तासभर शोध घेऊनही ते सापडत नसल्याने या प्रकाराबाबत मुरगाव पोलिस तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. विविध कारनाम्यांसाठी परिचित असलेल्या सडा उप कारागृहातून खून प्रकरणातील दोन कैदी व चोरी प्रकरणातील एक कैदी फरार झाल्याची माहिती कारागृह प्रमुख मिहीर वर्धन यांना मिळताच त्यांनी सकाळी येथे भेट देऊन घटनेबाबत पूर्ण माहिती घेतली. याच प्रमाणे आज सकाळपासून सडा उप कारागृहाचे उप अधीक्षक भानुदास पेडणेकर, मुरगाव पोलिस उपअधीक्षक महेश गावकर, पोलिस निरीक्षक राजन निगळे, पोलिस उपनिरीक्षक प्रशल देसाई व मुरगावचे उपजिल्हाधिकारी लेविन्सन मार्टिन्स यांनी तपास सुरू केला. मुरगाव पोलिसांनी पूर्ण दिवस सर्वत्र नाकाबंदी करून फरारी कैद्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण कोणताच पुरावा सापडला नाही. मुरगाव पोलिस स्थानकात भा.दं.सं. २२४ कलमाखाली तिन्ही कैद्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, उप कारागृहातील १३ क्रमांकाच्या कोठडीतील भिंतीला भगदाड पाडण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून चालत होते, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना कसे कळले नाही? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी तथा सडा उप कारागृहाचे प्रमुख मार्टिन्स यांना विचारले असता शौचालयाच्या भिंतीला भगदाड पाडण्यासाठी वापरण्यात आलेली कोणतीच वस्तू येथे सापडलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी भगदाड पाडण्यात आले आहे तेथे रक्ताचे काही डाग सापडल्याने फरार झालेले कैदी येथून बाहेर निघत असताना जखमी झाल्याचा संशय आहे.
आज पहाटे फरार झालेल्या कैद्यांपैकी हिटलर फर्नांडिस यापूर्वी आग्वाद येथील तुरुंगातून फरार झाला होता. सांगे येथील हिटलर कुडचडे येथे १९८९ सालच्या एका खून प्रकरणी येथे शिक्षा भोगत होता. याच वर्षी मडगाव येथील बाजारात दिवसाढवळ्या खून प्रकरणात मडगाव पोलिसांनी अभिजित पाटील (रावणफोंड) याला अटक करून सडा येथे न्यायालयीन कोठडीत ठेवले होते. तर, सेबी फर्नांडिस याला मायणा कुडतरी येथील चोरीच्या प्रकरणी येथे ठेवण्यात आले होते. मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
--------------------------------------------------------------
१० वर्षांत १६ कैदी पळाले
सडा उप कारागृहातून गेल्या दहा वर्षांत १६ कैद्यांनी पलायन केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. उप कारागृहातील कूपनलिका, शौचालयाच्या भिंतीला भोक पाडून तसेच कुंपणावरून उडी मारून पलायन करण्याचा घटना घडल्या आहेत. २००० साली डिंटेल जस्टीन व महम्मद नावाच्या दोन कैद्यांनी वेगवेगळ्या घटनेत पलायन केल्यानंतर त्यांना पुन्हा पकडण्यास यश आले होते. २००२ साली एकाच घटनेत उप कारागृहाच्या भिंतीला भोक पाडून फरार झालेले पल्लनी स्वामी, अर्जुन ढकने व कनकराज नागप्पा अद्याप फरार आहेत. २००५ साली हनुमंत रामचंद्र तलवार याने सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून पलायन केले होते. नंतर त्याला कर्नाटक येथून अटक करण्यात आले होते. २००६ साली तीन वेगवेगळ्या घटनांत झेव्हियर डिसोझा, राहुल शर्मा, राजाराम, राजू मावल व सलीम शेख यांनी पलायन केले तर भिंतीला भोक पाडून पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या ब्रोमसन फर्नांडिस याला गजाआड करण्यात आले होते. २००७ साली राजू गोलार या कैद्याने न्यायालयात नेले जात असताना पळ काढण्याचा प्रयत्न केला, त्याला पुन्हा पकडण्यात आले. आता आणखी तीन कैद्यांनी पलायन केले असून येथील व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी मंत्री मिकी पाशेको यांनी येथील व्यवस्थेवर ताशेरे ओढल्यानंतर झालेल्या या घटनेमुळे हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची आवश्यकता अधिक स्पष्ट झाली आहे.

No comments: