शिवाजी महाराजांच्या समकालीन साहित्यात त्यांच्या चरित्रातील अनेक घटनांचा उल्लेख आणि त्यांच्या बाबतीत केलेली विधाने आहेत.
त्या विधानांच्या आधारे महाराष्ट्रीय, बंगाली व युरोपियन इतिहास लेखकांनी शिवचरित्रे लिहिली. जेम्स लेन म्हणतो " My concern here is to analyse the way these events begin to from a narrative and in short, make a good story (पृ २०)
मी पहिल्या प्रकरणात दिल्याप्रमाणे जेम्स लेनच्या मनातला हेतू शिवचरित्र ही मिथ्यकथा आहे Legend आहे. ती story आहे, History नव्हे हे दाखविण्याचा आहे. शिवचरित्राची Good story बनविण्यासाठी ज्या तीन घटनांचा आधार घेतला जातो त्या १) अफजलखान वध, २) शाहिस्ताखानाला जरब बसविण्यासाठी खुद्द लालमहालात प्रवेश आणि ३)आग्य्रावरून सुटका, ४) तसेच प्रत्यक्ष शिवाजी महाराज सहभागी नसले तरी त्यांच्या सवंगड्याने आणि विश्वासातील सेनानीने केलेला अतुलनीय रणसंग्राम, सिंहगडाचा विजय व तानाजी मालुसरेचे हौतात्म्य या आहेत.
तीनशे वर्षापूर्वी घडलेल्या या घटना वास्तवात घडल्या होत्या. त्या मिथ्यकथा नाहीत. मात्र त्या समकालिनांनी रंगविताना त्याला साहित्यिक आणि धार्मिक डूब दिली. त्याचाच बाऊ जेम्स लेनने केला आहे.
अफजलखान वध ही वास्तवात घडलेली घटना आहे. अत्यंत खुनशी, दगाबाज, धर्मद्वेष्टा आणि व्यक्तिगतरीत्या शहाजी भोसले व कुटुंबाशी वैर साधणारा अफजलखान जावळीच्या अरण्यात आला.
त्यामागे त्याचा हेतू शिवाजी महाराजांना आदिलशाहीची सरदारकी द्यायचा नव्हता. महाराजांच्या समकालीनांच्या साहित्यात अज्ञानदासाचा पोवाडा हा अफजलखानाच्या वधानंतर लगेच आलेला तर कविन्द्र परमानंदांच्या शिवभारतीत वर्णन काही वर्षानंतरचे आहे.
अफजलखान हा विजापूर दरबारातील एक महत्त्वाचा सरदार होता. त्याची अनेक कारणांनी प्रसिध्दी होती. तो कर्तबगार होता. बलाढ्य होता. स्वतः अंगापिंडाने मजबूत होता. त्याला लढाईचे आणि राजकारणाचे चांगले ज्ञान होते. त्याचवेळी तो धर्मद्वेष्टा आणि विश्वासघातकी होता. त्याने स्वतःचे बिरुद घेतले होते. " कातिले मुतमर्रीदान व काफिरात। शिकंदए बुनियादे बुतान। म्हणजे "मी काफिर व बंडखोरांची कत्तल करणारा मूर्तीचा पाया उखडून टाकणारा आहे' (शककर्ते शिवराय पृ. ३१०) .खानाचा फार्सी शिक्का उपलब्ध आहे, त्या शिक्यातील मजकुराचा अर्थ "जर श्रेष्ठ स्वर्गाला इच्छा झाली की उत्तम माणसांची उत्तमता व अफजल खानाची उत्तमता यांची तुलना करून दाखवावी, तर प्रत्येक ठिकाणाहून जपमाळेतील अल्ला अल्ला या ध्वनीच्या जागी अफजल अफजल असाच ध्वनी उमटू लागेल' (श. शि. पृ. ३१०)
आदिलशाहीची सर्वेसर्वा असलेल्या बड्या साहिबिणीने अफजलखानाला महाराजांना ठार मारण्याची आज्ञा दिली होती. त्या संबंधी अली आदिलशहाचा शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा हुकूम तारीख - इ- अली यातील नोंदी मध्ये मिळतो (ग. भा. मेहेंदळे, श्री राजा शिवछत्रपती खं. १, भाग १, पृ ८८६) (सेतू. मा. पगडी पृ. ९३)
अशा अफजलखानाला जावळीत आणले, ऐनवेळी काय घडू शकेल याचा विचार करून तयारीत असणे आणि तशी वेळ येताच, अत्यंत सतर्क राहून खानाच्या शारीरिक बळावर मात करून त्याचा वध करणे, हे करण्यासाठी लागणारे अतुलनीय शौर्य आणि दूरदृष्टी महाराजांपाशी होती. अफजलखान जसा महाराजांना मारायला आला होता, तसेच महाराजांनीही त्याला जिवंत जाऊ दिला नसता हे ही समजून घ्यायला पाहिजे, खानाशी झालेल्या झटापटीत महाराजांना जरी काही दगाफटका वा मृत्यू आला असता तरी गडावरून बार उडून अफजलखानाच्या सैन्यावर मराठे दात ओठ खात तुटून पडलेच असते. अफजलखान वध हे शिवाजी महाराजांची कसोटी पाहणारे पहिले महासंकट होते.
(क्रमशः)
Monday, 2 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment