Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 1 August 2010

ड्रगप्रकरणी "सीबीआय' चौकशीची राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची मागणी

दिल्लीतील श्रेष्ठींनाही ठरावाची प्रत पाठवणार
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नव्यानेच स्थापन झालेल्या राज्य कार्यकारिणीची पहिलीच बैठक आज राजधानीत पक्ष मुख्यालयात होऊन ड्रग माफिया - पोलिस व राजकारणी सोटेलोटे प्रकरण ताबडतोब "सीबीआय' कडे सोपवावे, असा एकमुखी ठराव या बैठकीत संमत करण्यात आला. सदर ठरावाची प्रत दिल्लीत पक्षाच्या श्रेष्ठींकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी दिली. आज येथे बोलावलेल्या पत्रपरिषदेत जुझे फिलिप यांनी ही माहिती दिली.
पत्रपरिषदेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. कार्मो पेगादो, प्रा. सुरेंद्र सिरसाट, पांडुरंग राऊत, संगीता परब, सरचिटणीस उल्हास नाईक, ऍड. अविनाश भोसले, प्रकाश फडते, राजन घाटे, ट्रोझन डिमेलो व अन्य पदाधिकारी हजर होते. ड्रग माफिया व पोलिस साटेलोटे प्रकरणी "सीबीआय' चौकशीचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीतही आम्ही उपस्थित करणार असून राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या भावना मंत्रिमंडळासमोर मांडल्या जातील, असेही जुझे यांनी नमूद केले.
यापुढे दर मंगळवारी पक्षाचे दोन्ही मंत्री पक्ष कार्यालयात जनतेसाठी व पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी हजर राहतील. यावेळी जनतेच्या विविध समस्या तसेच कार्यकर्त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या जातील. प्रदेशाध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर राज्यातील सर्व तालुक्यांना आपण भेट देणार आहोत, असेही जुझे यांनी सांगितले.
मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादींच्या पक्षश्रेष्ठींवर दबाव आणल्याचा आरोप केला आहे.
याप्रकरणी आपल्याला काहीही माहिती नाही. पाशेको यांच्या राजीनाम्यासंबंधी श्रेष्ठींनी विधिमंडळ नेता या नात्याने विश्वासात घेतले नाही, असे ते म्हणाले.
राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे व येत्या आठवड्यात त्यास सकारात्मक प्रतिसाद लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

No comments: