मडगाव, दि. १ (प्रतिनिधी) : नावेली ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या ग्रामसभेत गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामास तीव्र विरोध दर्शवण्यात आला व महामार्ग आणखी रुंद न करता आहे तसाच ठेवावा, अशी मागणी करणारा ठराव संमत करण्यात आला.
सरपंच पॉल फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेने कचरा समस्येवरही गांभीर्याने चर्चा केली व त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली.
सध्या संपूर्ण गोव्यात राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण हा चिंतेचा व म्हणून कळीचा मुद्दा ठरलेला असून नावेली ग्रामसभेत त्याचे प्रत्यंतर आले. परंपरागत असलेली लोकांची शेकडो घरे, शेतीबागायती नष्ट करून हा महामार्ग हवाच कशाला, असा सूर सभेत दिसून आला तर काहींनी गोव्याला वगळून महाराष्ट्रातून सरळ तो महामार्ग कर्नाटकाशी जोडावा अशी सूचना केली. या सहापदरी महामार्गामुळे साळ नदीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल, अशी भितीही आणखी काहींनी व्यक्त केली.
नावेली चर्च ते बसथांबा पर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी सरकारकडून आलेल्या प्रस्तावावरही ग्रामसभेने चर्चा केली पण या रुंदीकरणामुळे चर्च वास्तूला कोणताही धक्का पोचता कामा नये, अशी अट घालण्याचा ठराव संमत करण्यात आला. यावेळी सरपंचांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून संपूर्ण तपशिल गोळा करूनच काय तो निर्णय घेतला जाईल,असे स्पष्टीकरण केले.
कचरा समस्या सोडविण्यासाठी उपस्थितांनी अनेक उपाय सुचविले असता बहुमजली इमारतींतील रहिवाशांनी त्यांच्या घनकचऱ्याची विल्हेवाट त्यांनीच लावावी, प्लास्टिक कचरा मात्र पंचायतीने गोळा करावा असा निर्णय घेण्यात आला. सकाळी ११ वाजता सुरु झालेली ग्रामसभा दुपारी १ वाजेपर्यंत चालली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment