प्रमुख जेटींवर अजूनही शुकशुकाटच
मडगाव, दि. १ (प्रतिनिधी) : गेल्या १५ जूनपासून गोव्यात लागू झालेल्या यांत्रिक मच्छीमारीवरील निर्बंध कालपासून संपुष्टात आले व आजपासून मच्छीमारी सुरू झाली. मात्र खवळलेल्या दर्यामुळे आज अपेक्षेप्रमाणे यांत्रिक नौका समुद्रात गेल्या नाहीत. परिणामी मच्छीमारी जेटीवर नेहमीची लगबग जाणवली नाही.
दक्षिण गोव्यातील प्रमुख अशा कुटबण जेटीवरून आज फक्त दहा ते पंधरा नौकाच समुद्रात गेल्या अशी माहिती उपलब्ध झाली आहे. या जेटीवरून एरवी ३०० यांत्रिक नौका ये - जा करतात; परंतु खराब हवामान व त्यामुळेच त्यावर काम करणारे परराज्यातील कामगार अजून न परतल्यामुळे हंगाम सुरू होऊनही या व्यवसायांतील मंडळी अस्वस्थ आहे.
त्या मानाने वास्को धक्क्यावरून अधिक प्रमाणात नौका गेल्या; पण त्या नेमक्या किती होत्या ती संख्या उपलब्ध झाली नाही. तेथील सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे आठवडाभरात मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू होईल.
नौकांवर काम करणारे बहुतेक कामगार हे ओरिसा व झारखंडमधील आहेत. दोन महिन्यांपूर्वी ते घरी गेले आहेत. त्यांतील ८५ ते ९० टक्के कामगार अजून परतले नसले तरी ते आठवडाअखेर परततील. त्यानंतर मासेमारीस जोम येईल, असे सांगितले जाते.
बहुतेक नौकामालकांनी गेले दोन महिने मिळालेल्या मोकळिकीचा फायदा घेऊन नौकांची आवश्यक ती डागडुजी, रंगकाम तसेच जाळ्यांची दुरुस्ती करून घेतली आहे. त्यांतील काहींनी काल धर्मगुरुंना नौकांवर आणून प्रार्थना केल्या; तर काहींनी नौकांची पूजाही केली.
गोव्यातील यांत्रिक मच्छीमारी जरी १५ जूनपासून लागू झालेली असली तरी प्रत्यक्षात गेल्या वर्षीच्या वादळाचा अनुभव घेतलेले ट्रॉलरमालक व त्यावरील कामगारांनी पंधरा दिवस अगोदरच एकेक करून ट्रॉलर किनाऱ्यावर आणले होते.
आता हंगाम सुरू झालेला असला तरी खवळलेला दर्या व वादळी हवामान तसेच हवामान खात्याने समुद्रात न जाण्याचा दिलेला इशारा यामुळे हंगामाला नेमका कधी जोर चढेल याबाबत सगळेच साशंक आहेत.
Monday, 2 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment