Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 30 May 2009

पूजा नाईक विरोधात वातावरण तापू लागले

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - "सीरियल किलर' महानंद नाईक याच्या पापकर्मात पत्नी पूजा नाईक हिचा सहभाग असल्याचे उघड होत चालल्याने तिच्याविरोधात महिलावर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
पैसे आणि सोन्याच्या लोभापायी मुलींची हत्या करण्यासाठी सावज हेरून ते आपल्या पतीला पुरवणे हे अत्यंत नीच कृत्य पूजा करीत असल्याच्या संशयावरून तिला त्वरित अटक करून चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, फोंडा परिसरात गेल्या वर्षभरात तरुणींनी केलेल्या आत्महत्या प्रकरणांची चौकशी पुन्हा नव्याने करण्याची मागणी करण्यात येत आहे. बेपत्ता होणाऱ्या तरुणींच्या हत्येमागे महानंद नाईक असल्याचे स्पष्ट झाल्याने फोंडा तालुक्यात गेल्या वर्षभरात तरुणींनी केलेल्या आत्महत्ये मागील "ती' व्यक्ती कोण आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. महानंदसारखाच तरुणींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा आणखी कोणी नराधम तेथे वावरत नाही ना, अशी शंकाही व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षभरात फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत अनेक तरुणींनी आत्महत्या केली आहे. त्यातच एका सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालेल्या तरुणीने केलेली आत्महत्या "गाजली' होती. फोंडा परिसरातील काही महिलांनी या आत्महत्येमागे काळेबेरे असल्याची शक्यता व्यक्त करून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. मात्र त्यावेळी फोंडा पोलिस स्थानकाच्या संबंधित निरीक्षकांनी मुख्य संशयिताला उजळ माथ्याने फिरण्यासाठी रान मोकळे करून दिले होते. बेपत्ता होणाऱ्या आणि तरुणींचा मृतदेह सापडल्यानंतर अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करून फाइली बंद केल्या गेल्या. त्याचप्रकारे तरुणींनी केलेल्या आत्महत्यांच्याही फाईली बंद करण्यात आल्या आहेत. तथापि, सौंदर्य स्पर्धेत भाग घेतलेल्या तरुणीने केलेल्या आत्महत्येचे प्रकरण जोर धरू लागल्याने ते गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले होते. यावेळी तपासाची जबाबदारी गुन्हा अन्वेषण विभागाच्या महिला निरीक्षक सुनिता सावंत यांच्याकडे सोपवण्यात आली होता. हा तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती त्या तरुणीचे विचित्र अवस्थेतील छायाचित्रही लागले होते. तथापि, ते छायाचित्र कोणी काढले होते, याचा तपास झालाच नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी होत आहे.

No comments: