फोंडा, दि.२५ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद नाईक याने युवतीचे खून चोरून आणलेले सोन्याचे दागिने खरेदी करीत असल्याच्या आरोपावरून फोंडा पोलिसांनी काझीवाडा फोंडा येथील काझी बिल्डिंग मधील मे. रिवणकर ज्वेलर्स दुकानाचे मालक उल्हास रिवणकर याला आज (दि.२५) संध्याकाळी अटक केली. महानंद नाईक प्रकरणात सोनाराला अटक करण्यात आल्याने फोंड्यात खळबळ माजली आहे. आत्तापर्यंतच्या दहापैकी सात प्रकरणांचा उलगडा झाला असून तीन युवतींच्या खुनांच्या नेमक्या जागांचा शोध घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, निरंकाल येथील ज्या दोन युवती महानंदच्या तावडीतून सुटल्या होत्या, त्यांची जबानी पोलिसांनी आज नोंदवून घेतली आहे.
संशयित महानंद नाईक हा युवतींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना घरातून येताना सोन्याचे दागिने घालून येण्याची अट घालीत होता. त्या युवतीचे खून करून त्यांच्या अंगावरील दागिन्यांची चोरी करीत होता, असे स्पष्ट झाले आहे. युवतीचे खून केल्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिन्याचे काय केले? कुठे विकले? अशी विचारणा पोलीस अधिकाऱ्यांनी केल्यानंतर संशयित महानंद नाईक याने दागिने फोंड्यातील एका सोनाराला विकल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी महानंद नाईक याने काझीवाडा फोंडा येथील मे. रेवणकर ज्वेलर्स या दुकानात सोन्याच्या दागिन्याची विक्री केल्याचे सांगितले. तसेच पोलिसांना नेऊन दुकान सुध्दा दाखविले. महानंद नाईक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दागिने खरेदी करणारे सोनार उल्हास रेवणकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. महानंद नाईक हा चोऱ्या करीत असल्याचे सोनाराला माहीत होते. तरी त्याने पोलिसांना माहिती दिलेली नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
संशयित महानंद नाईक हा पोलिसांना सुरुवातीला चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीची सखोल चौकशी करीत असल्याने महानंद बऱ्याच बाबी उघड करीत नसल्याचे पोलिसांना आढळून आले. युवतीचे खून केल्यानंतर त्यांचे मृतदेह पाण्यात, नदीत टाकत असल्याचे सांगून वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, खरी माहिती जास्त काळ पोलिसापासून लपवून ठेवू शकला नाही. दहा युवतीचे खून केल्याची कबुली महानंद याने दिली आहे. युवतीच्या खुनांची ठिकाणे पूर्वी सांगितलेल्या माहितीपेक्षा वेगळी असल्याचे उघड झाले आहे.
आत्तापर्यंत महानंद नाईक याने कबुली दिलेल्या दहा खुनांपैकी सात युवतीच्या खून प्रकरणाची सविस्तर माहिती पोलिसांनी गोळा केली आहे. कु. योगिता, कु. दर्शना, कु. केसर, कु. नयन, कु.सुरत, कु. सुशीला, कु.अंजनी या सात प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या सातही युवतीचे मृतदेह किंवा त्यांचे हाडांचे अवशेष सापडले आहेत. तीन प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्या युवतीच्या खुनाची ठिकाणे सुध्दा बदललेली आहेत. सुनिता गावकर हिचा आमोणा येथे खून केल्याचे महानंद याने सांगितले आहे. वासंती गावडे हिचा बेतोडा आणि निर्मला घाडी हिचा बोरी येथे खून केल्याची कबुली दिली आहेत. सुनिता गांवकर हिचा आमोणा येथे खून केला. तर केरये खांडेपार येथे सापडलेली हाडे कुणाची ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण केरये खांडेपार येथे सुनिता गांवकर हिचा खून केल्याची कबुली दिली होती. या संबंधी चौकशी सुरू असून "ती' हाडे कुणाची ही माहिती सुध्दा उघड होईल, असे उपअधीक्षक शेराफीन डायस यांनी सांगितले. या प्रकरणी निरीक्षक सी.एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, उपनिरीक्षक निखिल पालेकर, उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण, उपनिरीक्षक संजय दळवी आदी तपास करीत आहेत.
Tuesday, 26 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment