चेन्नई, दि. २४ - संपुआ सरकारमध्ये द्रमुक सहभागी होण्याबाबतचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असून करुणानिधी यांनी रविवारी कॅबिनेट व राज्यमंत्री पदांसाठी उमेदवारांचे नाव निश्चित केले. त्यात टी.आर.बालू यांचा समावेश नसल्याची माहिती द्रमुकच्या विश्वसनीय सूत्राने दिली.
द्रमुक अध्यक्ष एम.करुणानिधी यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत रविवारी झालेल्या सामूहिक व खाजगी बैठकीबाबत अधिकृतपणे काहीच सांगण्यात आले नाही. मात्र त्यांचे पुत्र एम.के.अझगिरी, दयानिधी मारन आणि ए.राजा यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून सरकारमध्ये समावेश राहू शकतो. तेथेच द्रमुकच्या राज्यसभा सदस्य आणि करुणानिधी यांच्या कन्या कानिमोझी स्वतंत्र प्रभार असलेल्या केंद्रीय मंत्रिपरिषदेत स्थान मिळवू शकतात. त्याचप्रमाणे पक्षाच्या अन्य तीन नेत्यांना राज्यमंत्री म्हणून सरकारमध्ये स्थान मिळू शकते, अशी जोरदार चर्चा आहे.
द्रमुक संपुआ सरकारमध्ये सहभागी होणार नाही, अशी चर्चा सुरू असतानाच कानिमोझी यांनी मी सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला नाही, असे पत्रकारांना सांगितले. राजा यांना माहिती व तंत्रज्ञान, अझगिरी यांना रसायने व खते आणि मारन यांना वस्त्रोद्योग मंत्रालय मिळू शकते अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून या तिढ्यावर सोमवारी सकाळपर्यंत तोडगा निघेल अशी शक्यता द्रमुकच्या सूत्राने वर्तविली. पंतप्रधान मनमोहन सिंग मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असून त्यात द्रमुकच्या आणखी काही मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो अशी शक्यताही सूत्राने वर्तविली.
बालू १९९९ पासून कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. त्यांना वाजपेयी सरकारमध्ये पर्यावरण आणि वन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. देवेगौडा मंत्रिमंडळातही ते पेट्रोलियम राज्यमंत्री राहीले. त्यानंतर यापूर्वीच्या संपुआ सरकारमध्ये ते भूतल परिवहन व जहाज वाहतूक मंत्री राहिले. परंतु यावेळी मात्र करुणानिधी यांच्या कौटुंबिक भांडणात बालू यांच्या हाती काहीच लागणार नाही असे सध्यातरी वाटत आहे. करुणानिधी यांनी रविवारी द्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांसोबत व्यक्तिगत व सामूहिकपणे सुमारे तीन तास चर्चा केली. असे असले तरी अंतिम निर्णय अद्याप व्हायचा असून त्याबाबत सोमवारी सकाळी घोषणा होऊ शकते.
मंत्रालयांच्या वाटपाचा कॉंग्रेसचा फॉर्म्युला आपल्याला स्वीकार नसल्याचे सांगून द्रमुकने मंगळवारी संपुआ सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. तडजोडीनंतर येत्या काही दिवसांत द्रमुक संपुआ सरकारमध्ये सहभागी होईल, अशी आशा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी व्यक्त केली होती.
Monday, 25 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment