पेडणे वेश्याव्यवसाय प्रकरण
पणजी, दि.२५ (प्रतिनिधी) - पेडणे येथे तथाकथित वेश्या व्यवसायात गुंतल्याप्रकरणी पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आलेला पोलिस शिपाई राजेश सावंत याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या २६ रोजी पणजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. राजेश सावंत हा सध्या गायब आहे. उद्या जामिनावरील सुनावणीवेळी तो हजर राहण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पेडणे तालुक्यातील अनेक बडे धेंडेही सामील असल्याची चर्चा असून राजेश सावंत याची जबानी महत्त्वाची ठरणार असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची पूर्ण तयारी केली आहे.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस यांनी राजेश सावंत याच्या निलंबनाचा आदेश जारी केला होता. याप्रकरणी पद्धतशीरपणे चौकशी सुरू असून यात कोणताही राजकीय दबाव नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान, या प्रकरणात आणखीही काही पोलिस व स्थानिकांचा सहभाग असल्याची चर्चा या भागात सुरू असल्याने राजेश सावंत याच्या जबानीनंतरच हे स्पष्ट होईल,असेही यावेळी सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांची प्रतिष्ठाच धुळीस मिळाल्याने या प्रकरणावर पांघरूण घालण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पेडणे भागातील काही स्थानिक पंचायत सदस्यही यात सामील असल्याने आपल्या राजकीय सूत्रांच्या साहाय्याने हे प्रकरण मिटवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
पेडणेचे आमदार दयानंद सोपटे यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गोवा विधानसभा गृह खाते अस्थायी समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित केला होता. पोलिस याप्रकरणी हयगय करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. राजेश सावंत याच्या गायब होण्यामागे पोलिसांचाच हात असल्याची टीका या भागातील लोकांकडून केली जाते. म्हापसा पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी युवतीची रवानगी मेरशी येथील सुधारगृहात करण्यात आली खरी परंतु ही मुलगी या संपूर्ण प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असतानाही तिची जबानी मात्र अद्याप नोंदवली नसल्याचे कळते. या मुलीला चक्क सुधारगृहातून पलायन करण्यास मदत करून या प्रकरणालाच पूर्णविराम देण्याचे प्रयत्नही सुरू होते,अशीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
Tuesday, 26 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment