पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - "सीरियल किलर' महानंद नाईक याचे ""कारनामे'' फोंडा तालुक्यापर्यंत मर्यादित नसून पणजीतही त्याने महिलेला फसवल्याचे उघड झाले आहे. महानंदने आपण लग्न करणार असल्याचे सांगून आपल्या हातातील बांगड्या आणि गळ्यातील सोनसाखळी लांबवल्याची पोलिस तक्रार चिंबल येथील एका ४० वर्षीय अविवाहित महिलेने आज पणजी पोलिस स्थानकात दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची खातरजमा व प्राथमिक चौकशी करून महानंद नाईक याच्याविरोधात पणजी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला असल्याची माहिती निरीक्षक नॉलास्को रापोझ यांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार सुमन (नाव बदलण्यात आले आहे) आजारी असल्याचे दि. १ ऑक्टोबर २००७ मध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात रक्त चाचणी करण्यासाठी गेली होती. याठिकाणी महानंदाची सुमन हिच्याशी गाठ पडली. कोणताही ओळख नसताना महानंद आपल्याशी बोलायला लागला. पहिल्यांदा त्याने माझे नाव विचारले. सुमन असे मी माझे नाव सांगून फार्मसीत निघून गेले. काही मिनिटांतच महानंद माझ्या पाठोपाठ फार्मसीत आला आणि खाली पडलेले दहा रुपये काढून मला दिले. यावेळी त्याने माझ्याशी पुन्हा बोलायला सुरुवात केली. बोलण्याच्या ओघात त्याने माझा मोबाईल क्रमांकही मागून घेतला. त्यानंतर मी घरी निघून गेले.
दुसऱ्या दिवशी दि २ ऑक्टोबर रोजी सकाळी महानंदने मला दूरध्वनी केला. मला तू आवडलेली असून पणजी येथील महालक्ष्मी मंदिराकडे भेटायला ये, असे सांगितले. पण मी त्याला स्पष्ट नकार दिला आणि मोबाईल बंद केला. त्यानंतर दि. ३ ऑक्टोबर रोजी त्याने पुन्हा दूरध्वनी केली. मी तुझ्याशी लग्न करायला तयार असून माझे वडील तुला पाहण्यासाठी महालक्ष्मीच्या मंदिरात आले आहेत, असे सांगितले. त्यामुळे त्यादिवशी मी आणि माझी आई असे दोघीही महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो. यावेळी त्याने माझ्या आईला मंदिरात बसण्याची विनंती केली आणि माझ्याशी काही बोलायचे आहे, असे सांगून जवळच असलेल्या एका इमारतीत घेऊन गेला. यावेळी त्याने माझ्या गळ्यात असलेली सोनसाखळी बनावटी दिसते, असे सांगून काढून घेतली. त्यानंतर जबरदस्तीने हातातील बांगड्याही काढून घेतल्या. यावेळी त्याने मला मारण्याची धमकी दिल्याने मी गडबड केली नाही, याची संधी घेऊन त्याने पोबारा केला. मी घडलेली हकिकत येऊन आईला सांगितली, परंतु, समाजात लाज जाईल म्हणून त्यावेळी पोलिस तक्रार दिली नसल्याचे त्या तरुणीने सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून महानंदचे वर्तमानपत्रावर छायाचित्र प्रसिद्ध होत असल्याने त्याची ओळख पटली, असेही सुमन हिने सांगितले.
पोलिसांनी महानंदच्या विरोधात चोरीचा आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून याविषयीचा अधिक तपास निरीक्षक नॉलास्को रापोझ करीत आहे.
Thursday, 28 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment