महानंद प्रकरण
फोंडा, दि.२६ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याच्याकडील चोरीचे सोन्याचे दागिने विकत घेतल्याच्या आरोपावरून फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या उल्हास रिवणकर या सोनाराकडून सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचे पाऊण किलो सोने हस्तगत करण्यात पोलिसांना आज (दि.२६) यश आले आहे. दरम्यान, येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने उल्हास रिवणकर याला सशर्त जामीन मंजूर केला आहे.
सिरीयल किलर महानंद नाईक याने आपल्या जबानीत खून करण्यात आलेल्या युवतींच्या अंगावरील चोरण्यात आलेले सोन्याचे दागिने काझीवाडा फोंडा येथील रिवणकर ज्वेलर्सना विकल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे फोंडा पोलिसांनी रिवणकर ज्वेलर्सचे मालक उल्हास रिवणकर याला सोमवार २५ मे ०९ रोजी संध्याकाळी अटक केली होती.
येथील पोलिसांनी उल्हास रेवणकर यांना २५ रोजी अटक केल्यानंतर त्यांच्यावतीने येथील प्रथम श्रेणी न्यायालयात जामिनासाठी त्याच दिवशी रात्री आठ वाजता अर्ज करण्यात आला होता. सदर जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. आज (दि.२६) रोजी पोलिसांनी याप्रकरणी तपास काम करून महानंद नाईक याने विकलेले सोने हस्तगत केले. सुमारे पाऊण किलो सोने ताब्यात घेण्यात आले असून त्याची किंमत सुमारे १० लाख ५० हजार रुपये एवढी होत आहे. दरम्यान, संशयित उल्हास रिवणकर यांनी येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. याप्रकरणी उपअधीक्षक शेराफीन डायस, पोलिस निरीक्षक सी.एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी पंचनामा केला.
दरम्यान, सीरियल किलर महानंद नाईक याने केलेल्या युवतींच्या खून प्रकरणाची चौकशी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. संशयित महानंद नाईक याने दिलेल्या जबानीची पडताळणी केली जात आहे. त्यांच्याकडून आणखी काही नवीन माहिती मिळविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
Wednesday, 27 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment