Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 25 May 2009

"सीरियल किलर'ला नाट्यमय वळण

खून केल्याची ठिकाणे बदलली
मानवी हाडे व कपडेही हस्तगत


फोंडा. दि. २४ ( प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद नाईक याने दहा युवतींच्या खुनाची कबुली दिलेली असली तरी त्याने पोलिस तपासकामात दिलेली माहिती चुकीची होती हे आता उघड झाले झाले आहे. महानंदने आपण केलेल्या युवतींच्या खुनाची जी ठिकाणे दाखवली होती ती पूर्णपणे चुकीची होती हे आता पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे महानंद प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची चिन्हे उत्पन्न झाली आहेत.
यासंदर्भात राय आणि बांबोळी येथून आज पोलिसांनी मानवी हाडे हस्तगत केली आहेत.
महानंदने अंजनी गावकर हिचा खून आपण ओपा - कोडार या डोंगराळ भागात केल्याची कबुली सुरुवातीस दिली होती; मात्र आता अंजनीचा खून राय भागात केल्याचे त्याने उघड करून खून करण्यात आलेली जागाही दाखवली. त्या जागेतून पेलिसांनी एक मानवी सांगाडा व कपडेही ताब्यात घेतली आहेत.
कुडका येथील सुशीला फातर्पेकर हिचा रायबंदर येथे खून केल्याचे महानंदने सुरुवातीच्या पोलिस चौकशीत सांगितले होते; मात्र सुशीलाचा खून रायबंदरला झाला नसून बांबोळी पठारावर झाल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात बांबोळी पठारावरून पोलिसांनी मानवे हाडे ताब्यात घेतली आहेत.
तसेच महानंदने सुरुवातीला आपण सुरत गावकर या तरुणीचा खून बोरी येथे केल्याचे मान्य केले होते. मात्र आता त्याने सुरतचा खून पारोडा - चंद्रेश्वर भूतनाथ या भागात केल्याचे मान्य केले आहे. केसर हिचा खून सावर्डे येथे करून तिचा मृतदेह नदीत फेकल्याचे त्याने सुरुवातीला सांगितले होते; मात्र आता त्याने कबूल केल्याप्रणाणे तो खून रिवण येथे केला गेला होता. त्यावेळी स्थानिक पोलिसांना रिवण येथे मानवी हाडेही सापडली होती.
महानंदने आपण नयन गावकर हिचा खून सावर्डे भागात केला होता असे प्राथमिक चौकशीत पोलिसांना सांगितले होते; मात्र आता त्याने कबुली दिल्याप्रमाणे तो खून फातोर्डा - मडगाव येथील एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी त्याने केला होता.
दरम्यान, योगिता नाईक आणि दर्शना नाईक यांच्या मृतदेहांची ओळख यापूर्वीच पटलेली आहे. तसेच सुनिता गावकर हिची खून केलेल्या भागातून हाडेही यापूर्वीच पोलिसांनी हस्तगत केली आहेत. याशिवाय आणखी तीन प्रकरणातही आपण यापूर्वी दिलेली माहिती चुकीची होती परंतु, त्यांचा तपशील पोलिसांनी अद्याप दिलेला नाही. उद्या तोही मिळण्याची शक्यता आहे.
महानंदच्या या गाजलेल्या खून प्रकरणात उपअधीक्षक शेराफीन डायस, पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील, उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, लक्षी आमोणकर, निखील पालेकर व हेड कॉन्स्टेबल सावळो नाईक आणि प्रताप परब अधिक तपास करीत आहेत.

No comments: