"तपास सीबीआयकडे द्या'
फोंडा, दि.२३ (प्रतिनिधी) - पारंपई मडकई येथील कु. तनुजा नाईक खून प्रकरणी फोंडा पोलिसांनी केलेली बनवेगिरी न्यायालयात उघड झाली आहे. कु. तनुजा खून प्रकरणात स्थानिक युवक गुंतलेला असून त्याला ताबडतोब अटक करावी आणि या खून प्रकरणाचे तपासकाम सीबीआयकडे द्यावे, या मागणी पुनरुच्चार तनुजा नाईक मृत्यू कृती समितीचे अध्यक्ष शशी पणजीकर यांनी आज (दि.२३) संध्याकाळी एका पत्रकार परिषदेत बोलताना येथे केली आहे.
यावेळी कु. तनुजा नाईक हिचे वडील काशिनाथ नाईक आणि भाऊ उपस्थित होता. तनुजा नाईक हिच्या खून प्रकरणात गावातील युवक गुंतलेला आहे, असा दावा श्री. पणजीकर यांनी यावेळी बोलताना केला. केवळ राजकीय दबावामुळे संशयित युवकाला अटक करण्यासाठी पोलिस पुढे येत नाहीत. कु. तनुजा नाईक हिच्या खून प्रकरणी फोंडा पोलिसांनी एकाला अटक केल्याची माहिती मिळाली. त्यावेळी आपण फोंडा पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अटक करण्यात आलेला संशयित निर्दोष असल्याचे सांगितले होते. केवळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी हे अटक नाट्य करण्यात आल्याचा दावा आपण केला होता. आपण त्यावेळी केलेला सदर दावा अखेर खरा ठरला आहे, असेही श्री. पणजीकर यांनी सांगितले.
तनुजा नाईक खून प्रकरणाचे तपास काम सीबीआयकडे द्यावे, ही आमची मागणी कायम आहे. तनुजा खून प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेल्या अधिकाऱ्यांची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी श्री. पणजीकर यांनी केली. या प्रकरणात गुंतलेल्या संशयित युवकाचे नाव यापूर्वीच फोंडा पोलिसांना दिलेले आहे. मात्र, त्याची कसून चौकशी करण्यात आलेली नाही. या खून प्रकरणाचे तपास काम सीबीआयकडे द्यावे, या मागणीसाठी आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावेळी तपास काम योग्य दिशेने सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या खून प्रकरणी दोघांना अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. पोलिसांचा तपास योग्य दिशेने नसल्याचे उघड झाले आहे. आता समितीतर्फे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व गृहमंत्र्याना निवेदने सादर करून खुनाचे तपासकाम सीबीआयकडे देण्याची मागणी केली जाणार आहे. सरकारने या मागणीची दखल न घेतल्यास पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली जाणार आहे, असेही श्री. पणजीकर यांनी सांगितले.
कु. तनुजा हिच्या मारेकऱ्याला शिक्षा व्हावी यासाठी वृद्धापकाळात सुध्दा आपण प्रयत्न करीत आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने निर्दोष ठरविल्याने अजून आम्हांला न्याय मिळालेला नाही. आम्हांला न्याय देण्यासाठी सरकारने हे खुनाचे प्रकरण सीबीआय कडे सोपवावे आणि आम्हांला न्याय द्यावा, अशी मागणी कु. तनुजा नाईक हिचे वडील काशिनाथ नाईक यांनी केली. आम्ही एका संशयिताचे नाव पोलिसांना दिले होते. मात्र, पोलिसांनी संशयिताची योग्य चौकशी केलेली नाही, असा दावा काशिनाथ नाईक यांनी केली आहे.
Sunday, 24 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment