Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 27 May 2009

मंत्रिमंडळ विस्तार उद्या होण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि. २६ - करुणानिधी यांच्या द्रमुक पक्षाने सरकारमध्ये सहभागी होण्याचे मान्य करताच मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. पण, आज होणारा विस्तार दोन दिवस लांबणीवर पडला असून, गुरुवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पहिल्या टप्प्यात पंतप्रधान आणि १९ कॅबिनेट मंत्र्याचा शपथविधी पार पडला. दुसऱ्या टप्प्यात द्रमुकची सहमती आवश्यक होती. ती मिळाल्यानंतर आता खातेवाटपाच्या मुद्यावर काही निर्णय व्हायचे आहेत. याशिवाय, ममता बॅनर्जी यांनी आता आपली मंत्रिपदाची भूक वाढविली असून तृणमूलला सातऐवजी आठ मंत्रालये मिळावे, असा आग्रह धरला आहे. त्यांना सात मंत्रिपदे देण्याचे आश्वासन संपुआने दिले आहे. आता आणखी एक मंत्रालय कोणते दिले जाईल, यावर खल सुरू असल्याचे समजते. पण, कॉंग्रेसच्या सूत्रांनी असा कोणताही मुद्दा विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी नागरी उड्डयन मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित असून त्यांची उड्डयन मंत्री म्हणून दुसरी इनिंग सुरू होणार आहे. याशिवाय, राष्ट्रवादीतर्फे पी.ए.संगमा यांची कन्या अगाथा संगमा यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याचे वृत्त आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावर सोमवारी पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास चार तासपर्यंत प्रदीर्घ चर्चा झाली. त्याचे निष्कर्ष उद्यापर्यंत समोर येतील, असे मानले जात आहे.
चौकट
राज्यमंत्री नाराज
संपुआ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याचे कारण कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह असल्याचे मानले जात आहे. घटक पक्षांना खुश ठेवण्याच्या नादात कॉंग्रेसने आपल्या पक्षातील काही नेत्यांची उपेक्षा केल्याचे बोलले जात आहे. त्यातल्या त्यात यापूर्वीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असणाऱ्यांना यावेळी कॅबिनेट दर्जा मिळण्याची आशा होती. त्यांची यावेळी निराशा होताना दिसत असल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्याचे काम सध्या पंतप्रधान आणि सोनिया गांधी करीत आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

No comments: