चिदंबरम गृहमंत्रिपदी कायम
प्रणव मुखर्जीना अर्थ
ममतांकडे रेल्वे
पवारांना पुन्हा कृषी
ऍन्टनींकडे संरक्षण खाते कायम
नवी दिल्ली, दि. २३ - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कॅबिनेटमधील १९ पैकी ६ मंत्र्यांना शनिवारी खातेवाटप करण्यात आले. आश्चर्यजनकरित्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या एस.एम. कृष्णा यांना विदेश मंत्री बनविण्यात आले असून, पी. चिदंबरम यांच्याकडे गृहमंत्रालयाचा पदभार कायम ठेवण्यात आला आहे. माजी विदेशमंत्री प्रणव मुखर्जी यांना यावेळी अर्थमंत्रालयाचा ताबा देण्यात आला आहे. ए. के. ऍन्टनी यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची व शरद पवार यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना अपेक्षेनुसार रेल्वे मंत्रालय मिळाले आहे. उर्वरित खात्यांचे वाटत डीएमकेसोबतचा तिढा सुटल्यानंतर अथवा येत्या तीन-चार (मंगळवारपर्यंत) दिवसांत होणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या डावाची सुरुवात करणाऱ्या मनमोहनसिंग यांनी शनिवारी कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी १ ते ९ जून या कालावधीत नव्या संसदेचे पहिले अधिवेशन आयोजित करण्याचा कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली.
४ जूनपासून राज्यसभेचे अधिवेशन बोलाविण्याचा निर्णय झाला असल्याचेही चिदंबरम यांनी सांगितले. ३१ जुलैपूर्वी सरकार अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करेल. यासाठी सर्वच पक्षांसोबत चर्चा केली जाणार आहे. मंदीचा सामना करण्याला सरकार प्राधान्य देणार असून निवडणुकीदरम्यान कॉंग्रेसने दिलेल्या आश्वासने प्रामाणिकपणे पाळण्याचाही सरकार कसोशीने प्रयत्न करेल. या बैठकीत शुक्रवारी पंतप्रधानांसोबत शपथ घेणारे सर्व १९ मंत्री सहभागी झाले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
Sunday, 24 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment