वीज अभियंत्याला मारहाणप्रकरण
मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी)- समाजकार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिगिस यांनी मुख्य सचिवांना पाठविलेल्या कायदेशीर नोटिशीची मात्रा अचूक लागू पडली असून कोलवा पोलिसांनी पर्यटनमंत्री मिकी पाशेकोंविरुध्द २००६ मध्ये दाखल झालेल्या सरकारी कामावर असताना वीज अभियंत्याला केलेल्या मारहाण तक्रारीबाबत येथील प्रथम श्रेणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. पर्यटन मंत्र्यांविरुध्द यापूर्वीच त्यांच्या पत्नी सारा यांनी कौटुंबिक छळवणूक प्रकरणी दाखल केलेल्या खटल्याचे प्रकरण चालू आहे व त्यात आता या नव्या खटल्याची भर पडली आहे.
या आरोपपत्रांत पोलिसांनी मिकींवर कनिष्ठ वीज अभियंता कपील नाटेकर हा सरकारी ड्युटीवर स्वतःच्या कार्यालयात असताना त्याला मारहाण केल्याबद्दल भा. दं. च्या कलम ३५३ खाली आरोप ठेवला आहे.तसेच ३४२ व ५०४ कलमाखालीही आरोप ठेवले आहेत.
नाटेकर हा वीजखात्याच्या उपविभाग ३ मधील वेर्णा सबस्टेशनाशी संलग्न अभियंता असून त्याच्या तक्रारीप्रमाणे जुलै २००६ मध्ये मंत्र्यांनी त्याला त्यांच्या निवासस्थानी पाचारण केले व मारहाण केली.नंतर या प्रकरणावरून वादळ उठले होते व थंडही झाले होते.
आयरीश रॉड्रगिस यांनी आरोग्यमंत्री विश्र्वजीत यांच्याविरुध्द आपण नोंदविलेल्या धमकीप्रकरणी पोलिस आरोपपत्र दाखल करण्यात वेळकाढू धोरण अवलंबिल्याप्रकरणी कोर्टात धाव घेतली असता न्यायालयाने पोलिस खात्यावर ठपका ठेवला होता. त्यानंतर आयरीश यांनी आपला मोर्चा या अभियंता मारहाणीकडे वळवून कोलवा पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यायासाठी दहा दिवसांची मुदत दिली व पोलिसांनी कोर्टाकडून वस्त्रहरण होण्यापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्याचा शहाणपणा दाखवला.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तक्रारदार हा सरकारी कर्मचारी असल्याने आरोपपत्र ३५३ कलमाखाली गुदरावे की काय याबाबत कायदेशीर सल्ला मागविला होता तो मिळण्यास विलंब झाला व त्यामुळे आरोपपत्रासही विलंब झाला अशी सारवासारव पोलिसांनी चालविली आहे.
दरम्यान, पर्यटन मंत्र्यांनी असे आरोपपत्र दाखल झाल्याने मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्याची शक्यता फेटाळली आहे. आपले प्रकरण व दयानंद नार्वेकर यांचे तिकिट घोटाळा प्रकरण वेगळे आहे व त्यामुळे तो निकष येथे लावता येणार नाही . शिवाय नार्वेकर हे कॉंग्रेसचे होते तर आपण राष्ट्रवादीचा आहे व त्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीला घ्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
Thursday, 28 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment