Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 27 May 2009

मनोहर पर्रीकर इस्पितळात

मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी) : विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना आज अस्वस्थ वाटू लागल्याने येथील अपोलो व्हिक्टर इस्पितळात दाखल करण्यात आले व नंतर तातडीने कॉरोनरी अँजिओग्रफी करून आवश्यकता भासल्याने त्यांच्यावर नंतर लगेच यशस्वी अँजिओेप्लास्टीही करण्यात आली.
पर्रीकर यांना अपोलोत दाखल करण्यात आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. काही वृत्तवाहिन्यांनी ते वृत्त फ्लॅश केले. पर्रीकर यांच्या हितचिंतकांची तसेच चाहत्यांची व विविध नेत्यांची इस्पितळाकडे एकच गर्दी उसळली.
अपोलो व्हिक्टरचे संचालक तथा नामवंत ह्दयरोगतज्ज्ञ डॉ. उदय खानोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्रीकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सकाळी इस्पितळात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीतून निघालेल्या निष्कर्षांतून लगेच तातडीने ऍंजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांना २ ते ३ दिवस रहावे लागेल व त्यानंतर आठवडाभर निरीक्षणाखाली ठेवले जाईल. नंतर ३ ते ४ आठवड्यांनी त्यांना आपले नियमित व्यवहार हाताळता येतील असे डॉ. खानोलकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
पर्रीकर यांना सकाळी किंचित अस्वस्थ वाटू लागल्याने जवळचे मित्र संजय वालावलकर यांच्यासह ते आपले स्नेही तसेच कौटुंबिक डॉक्टर श्याम भंडारे यांच्याकडे तपासणीसाठी गेले होते. डॉ. भांडारे यांनी त्यांना तपासल्यानंतर लगेच स्वतः पर्रीकरांना घेऊन ते तातडीने अपोलोमध्ये आले व त्यामुळे लगेच पुढील तपासण्या व उपचार झटपट करता आले. अपोलोचे संचालक तथा नामवंत ह्दयरोगतज्ज्ञ डॉ. खानोलकर यांनी स्वतःच्या देखरेखाली पर्रीकरांच्या सर्व चाचण्या घेतल्या. डॉ.भांडारे हे सायंकाळपर्यंत "अपोलो'तच होते.
पर्रीकर यांना अपोलोत दाखल केल्याचे कळताच गोव्याच्या सर्व भागातील त्यांच्या चाहत्यांनी तेथे धाव घेतली. सर्वप्रथम दाखल झालेल्यात आमदार दामू नाईक, शर्मद रायतूरकर, रुपेश महात्मे, डॉ. देश प्रभूदेसाई, ऍड. नरेंद्र सावईकर, सिध्दनाथ बुयांव यांचा समावेश होता. सायंकाळी भाजप अध्यक्ष व खासदार श्रीपाद नाईक, मंत्री बाबूश मॉन्सेरात व मिकी पाशेको, आमदार निळकंठ हळर्णकर व आग्नेल फर्नांडिस, चर्चिल आलेमाव, गोविंद पर्वतकर, प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस विजय सरदेसाई यांनीही इस्पितळात जाऊन पर्रीकर यांचे बंधू अवधूत पर्रीकर व पुत्र अभिजात यांच्याशी त्यांच्या प्रकृतीसंदर्भात चौकशी केली.

No comments: