लखनौ, दि. २४ - गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेले आझम खान यांना समाजवादी पार्टीने सहा वर्षांसाठी निलंबित केले असून पाठोपाठ आझम खान यांनीही विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल सिंग यादव यांनी ही माहिती दिली. भाजपाचे माजी नेते कल्याण सिंग यांचे सपाशी जुळलेले संबंध आणि अभिनेत्री जयप्रदा यांना रामपूरमधील उमेदवारी देणे, या दोन मुद्यांवरून आझम खान यांचे पक्षासोबत मतभेद सुरू होते. पक्षाचे महासचिव अमरसिंग यांच्याशीही त्यांचे प्रचंड वाद झाले. मुलायमसिंग यांनी मध्यस्थी करून हा वाद सोडविण्याचा प्रयत्नही केला होता. पण, त्यांना यश आले नाही.
जयप्रदा यांना रामपूरमधून पाडण्याचेही प्रयत्न आझम खान यांनी केले. पक्षविरोधी कारवायांचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. आझम खान हे विधानसभेत पक्षाचे उपनेते आहेत. त्यांनी विधानसभेतील सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याचे समजते.
समाजवादी पार्टीच्या जडण-घडणीत आझम खान यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांना पक्षातील कारभार पटत नव्हता. अमरसिंग यांच्यासोबतचे मतभेद तर विकोपाला गेले होते. आज अखेर त्याचे पर्यवसान आझम खान यांच्यावरील कारवाईत झाले.
तालिबानने स्वातमध्ये
२०० शाळा पेटविल्या
लंडन, दि. २४ ः तालिबानी अतिरेक्यांनी पाकिस्तानातील स्वात खोऱ्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड धुडगूस घातला असून या काळात त्यांनी खोऱ्यातील २०० हून अधिक शाळा पेटवून दिल्या आहेत. या माध्यमातून आणि शिक्षेची घोषणा करून बालिकांना शिक्षणापासून रोखण्यासाठी तालिबानने सर्वतोपरी प्रयत्न चालविले आहेत.
"संडे टाईम्स'ने स्वातची राजधानी मिंगोरा येथून प्रकाशित केलेल्या बातमीत याचा उल्लेख केला आहे. तालिबानी नेते खोऱ्यात जाहीरपणे सांगतात की, जे लोक सच्चे मुसलमान आहेत, त्यांनी आपल्या मुलींना शाळेत जाण्यापासून थांबविले पाहिजे. "संडे टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, दररोेेेेेज सायंकाळी तालिबानी नेता मौलाना फजलुल्ला हा रेडिओवर अशा मुलींची नावे जाहीर करतो, ज्यांना शाळेत जाण्यापासून थांबविण्यात आले आहे. तो त्या मुलींची नावे घेऊन त्यांचे जाहीर अभिनंदन करतो. त्यानंतर तो लोकांना ताकीद देतो की, जे लोक शिक्षण घेणे सुरूच ठेवतील ते नरकात जातील.
मौलाना फजलुल्ला हा तालिबानचा कमांडर आहे. गेल्या दोन वर्षात त्याच्या सांगण्यावरून स्वात खोऱ्यात २०० हून अधिक शाळा पेटविण्यात आल्या आहेत. स्वात खोऱ्यात तालिबानने किती थैमान घातले आहे, याचे शब्दांकन एका मेडिकलच्या विद्यार्थ्याने केले आहे. शाळा जाळणे, प्रेत चौकात टांगणे, भर चौकात हंटर मारणे हे प्रकार होतातच. कापून ठेवलेले शिर लटकविले जातात आणि त्यावर लिहिलेले असते की, आमच्याशी गद्दारी करून शत्रूसाठी हेरगिरी करणाऱ्यांना हीच शिक्षा मिळते.
एक मध्यमवयीन महिला बाजारात खरेदीसाठी गेली असता तिला एका धाडधिप्पाड व्यक्तीने हटकले. दरडावून म्हटले की, तुला कोणी सांगितले नाही का की, बायकांना बाजारात येण्यास मज्जाव आहे. यापुढे दिसलीस तर ठार करू. मुली आणि बायकांना प्रचंड निर्बंधांमध्ये ठेवण्याची तालिबानची तऱ्हा आहे.
Monday, 25 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment