Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 29 May 2009

मिरची पूड फेकून ३ लाख पळविले


नावेली येथील प्रकार


मडगाव, दि.२८ (प्रतिनिधी) : नावेली येथील बॅंक ऑफ बडोदा शाखेमध्ये पैसे जमा करण्यासाठी आलेल्या येथील एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून व सुरीहल्ला करून त्याच्याकडील ३ लाखांची रक्कम असलेली बॅग पळविण्याचा थरारक प्रकार आज भर दुपारी घडला. शहरातील गजबजलेल्या भागात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली. या प्रकरणी मडगाव पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून सायंकाळपर्यंत विशेष असे कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागू शकले नव्हते.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाश्कॉल पिरीस यांचे लुदनिक अपार्टमेंटमध्ये घाऊक दारू विक्रीचे दुकान आहे. ग्राहकांकडून आलेली सुमारे ३ लाखांची रक्कम व काही चेक असलेली बॅग घेऊन ते जीए-०२-सी-५२९१ ही मोटारसायकल घेऊन दुपारी २-३० वाजता नावेली चर्चजवळील बडोदा बॅंकेच्या शाखेत आले होते. मोटरसायकल स्टॅंडवर उभी करून बॅग घेऊन बॅंकेकडे येत असतानाच काळी पॅंट व काळा टी शर्ट घातलेला एक पंचविशीचा तरुण समोरून त्यांच्या समोर आला. त्याने चटदिशी मिरचीची पूड त्यांच्या तोंडाच्या दिशेने फेकली. पण डोळ्यावर गॉगल असल्याने ती डोळ्यात गेली नाही, तेव्हा त्या तरुणाने त्यांच्यावर सुरी उगारली व बॅग हिसकावून बाहेर पळ काढला. बाहेर आणखी एक तरुण एका हिरो होंडा दुचाकीवर बसून त्याची वाट पाहत होता. काळ्या कपड्यातील व्यक्ती बॅग घेऊन पळत येत असल्याचे पाहून त्याने मोटरसायकल सुरू केली व दोघेही रावणफोंडच्या दिशेने पळाले.
यावेळी शेजारी असलेल्या थॉमस कुतिन्हो व प्रमिला रेडकर यांनी आरडा ओरडा केला. परंतु, तोपर्यंत ते दोघेही घटनास्थळावरून पसार झाले होते. दोघांपैकी कोणीही बोलण्यासाठी तोंड उघडले नाही, त्यामुळे त्यांची भाषा ही कळू शकलेली नाही. नंतर या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविली गेली.
पिरीस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बॅगेत रोख ३ लाख व काही धनादेश होते. बोरकर स्टोअरकडून आलेले २७ हजार, शंकर बांदेकर यांनी दिलेले १८ हजार, १४ हजारांचा एक चेक अशी मोठी रक्कम त्यात होती, अशी माहिती त्यांनी दिली. नावेली परिसरात अशा प्रकारे पडलेला हा पहिलाच धाडसी दरोडा मानला जातो.

No comments: