वास्को, दि. २५ (प्रतिनिधी)- वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील "लुपीन लिमिटेड' उद्योगामध्ये काम करत असताना २४ वर्षीय लिथून सुपोय वरान्ते हा युवक अडीच मीटरच्या उंचीवरून घसरून पडून नंतर मरण पावला. ओरिसा येथील रहिवासी असलेला लिथून गेल्या काही काळापासून गोव्यामध्ये काम करत असल्याचे वेर्णा पोलिसांनी सांगून गंभीर अवस्थेत त्यास गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आल्यानंतर उपचार घेत असताना त्याचे निधन झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ८.३० च्या सुमारास सदर घटना घडली."लुपीन औषधाच्या उद्योगामध्ये काम करीत असताना त्याचा अचानक पाय घसरून तो सुमारे अडीच मीटरच्या उंचीवरून खाली जमिनीवर कोसळला. सदर घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे वेर्णा पोलिसांनी सांगितले.त्यास तातडीने उपचारासाठी बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात दाखल केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान दुपारी १२.३० च्या सुमारास उपचार घेत असताना त्याचे इस्पितळात निधन झाले.
वेर्णा पोलिसांनी या वेळी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळीच्या शवागृहात पाठवून दिला आहे. २४ वर्षीय मयत लिथूनचे कुटुंबीय गोव्यात आल्यानंतर त्याच्या मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वेर्णा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक अभिषेक गोम्स यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
Monday, 25 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment