Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 26 May 2009

जोतकर भगिनी जिवंत?

अज्ञाताचा दूरध्वनीवरून दावा

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) - मडगाव येथून बेपत्ता असलेली दीपाली जोतकर व तिची मोठी बहीण या दोघीही जिवंत असल्याचे निनावी दूरध्वनी येत असल्याने फोंडा पोलिसांची तारांबळ उडाली आहे. हे दूरध्वनी बायलांचो एकवोट या महिला संघटनेच्या प्रमुख आवडा व्हिएगस यांनाही येत असल्याची माहिती मिळाली. मात्र हे दूरध्वनी कुठून येतात व कोण करतो, याची कोणतीही माहिती फोंडा पोलिसांकडे उपलब्ध नाही.
सीरियल किलर महानंद नाईक याचा फोटो वर्तमानपत्रावर प्रसिद्ध आल्यानंतर दीपाली जोतकर हिच्या आईने महानंदनेच आपल्याही मुलीला फुस लावून मारल्याची तक्रार मायणा कुडतरी पोलिस स्थानकात केली होती. परंतु, १० मुलीचे गळा घोटल्याची कबुली देणाऱ्या महानंदने अद्याप या दोघा बहिणीविषयी कोणताही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामागील गूढ अद्याप कायम आहे.
"या दोघी बहिणी जिवंत असून त्यांना आपण पाहिलेले आहे' अशी माहिती दूरध्वनी करून बोलणारा व्यक्ती देत असल्याची माहिती आवडा व्हिएगस यांनी दिली. या दूरध्वनीविषयी "गोवादूत'ने चौकशी केली असता येणारे सर्व दूरध्वनी उजगाव तिस्क या परिसरातून येत असल्याची माहिती मिळाली. दि. २३ मे रोजी पहिला दूरध्वनी आला. हा दूरध्वनी (०८३२-२३४५६६७) या क्रमांकावरून आला होता. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले की "मी दिपाली ज्योतकर हिला पाहिले आहे. एक बहीण बेळगाव येथे असते तर, दुसरी सावंतवाडी येते' एवढे बोलून त्याने दूरध्वनी ठेवला.
दुसऱ्या दिवशी दि. २४ रोजी (०८३२-२३४५६६७) या क्रमांकावरून पुन्हा दूरध्वनी आला. यावेळी त्याने त्या दोघी आता पनवेल येथे राहत असल्याची माहिती श्रीमती व्हिएगस यांना दिली. यापेक्षा अधिक काहीच ती व्यक्ती बोलली नाही. त्यानंतर पुन्हा ९९७०१२४५५२ या क्रमांकावरून व्हिएगस यांच्या मोबाईलवर दूरध्वनी करून "त्या दोघी बहिणी बेळगाव येथे आहेत. त्या तुमच्या नातेवाईक लागतात का' असा प्रश्न करून "मी त्यांना तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो', असे सांगितले. हा दूरध्वनी तिस्क ताक येथून आल्याची माहिती "गोवादूत'ला मिळाली आहे.

No comments: