पणजी, दि. १ (सांस्कृतिक प्रतिनिधी): माहिती खाते व गोवा मनोरंजन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित केलेल्या चौथ्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झाले. चित्रपटनिर्मितीत युवक पुढे सरसावत असल्याने गोव्याला त्याचा फायदा जरूर होईल, प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी त्यांच्या सोबत गोवा राज्याचे महासचिव जे. पी. सिंग, परीक्षक मंडळाचे अध्यक्ष नितीन केणी, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव राजीव यदुवंशी माहिती संचालक निखिल देसाई व्यासपीठावर उपस्थित होते. राजीव यदुवंशी यांनी स्वागतपर भाषण केले. दर्शना व संगीता यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे रवी नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
नाईक म्हणाले, युवकांना चांगली शिकवण देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होणे आवश्यक आहे. पूर्वी कोकणी भाषेतून चांगले चित्रपट निर्माण झाले होते. परंतु माध्यमाअभावी ते सर्व लोकांपर्यंत पोहचू शकले नाही. आजच्या काळात विविध माध्यमे उपलब्ध असल्याने चांगले चित्रपट लोकांपर्यत पोहचील यात शंकाच नाही. इतर राज्यातील लोक आपली मातृभाषा कधी विसरत नाही शिवाय प्राथमिक शिक्षण व सर्व व्यवहार मातृभाषेतून करत असतात, परंतु गोव्यात मात्र चित्र उलटे दिसते. या ठिकाणी प्राथमिक शिक्षण वेगळ्या भाषेतून घेतले जाते. किंबहुना काही घरातही इंग्रजीचा मारा असतो.
मुख्य सचिव जे. पी. सिंग यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले, गोव्यातील कलाकार, निर्माते पुढे येऊन विविध विषयावर चित्रपटांची निर्मिती करायला हवी म्हणूनच पूर्ण वर्षभर उत्तर आशियाखंड चित्रपट महोत्सव बाल चित्रपट महोत्सव असे विविध चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येतील. त्या करिता सुमारे १५० कोटी रु. खर्चून पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या असून, गोवा मनोरंजन सोसायटी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात सक्षम बनले असल्याचे ते म्हणाले. गोव्यातील चित्रपट निर्मात्यांनी पुढे येऊन विविध विषयावर चित्रपट निर्माण करावे व गोव्यात चित्रपट संस्कृती निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
चौथ्या चित्रपट महोत्सवात सादर होणाऱ्या चित्रपटात स्पर्धा घेतली जाणार असून, चित्रपट विभागातील स्पर्धेसाठी रोख बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. त्यासाठी मुंबईस्थित चित्रनिर्माते नितीन केणी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षक मंडळावर असलेले देवी दत्त, प्रा. ओलिवीनो गोम्स व व्ही. आर. नाईक यांची ओळख दयानंद राव यांनी करून दिली.
दि. २ मे ते ४ मे पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात माकिनीझ पॅलेसच्या स्क्रीनवर चित्रपटांचे प्रदर्शन होणार असून ते सर्वांसाठी खुले असतील. चित्रपट विभागातील स्पर्धेत राजेंद्र तालक क्रिएशनचे "अंतर्नाद' डिकॉस्ता फिल्म प्रोडक्शनचे "अर्दे चादर', सेवी पिंटो यांचे "भितरल्या मनाचो मोनीस या चित्रपटांचा समावेश असून हे चित्रपट दुपारी ११.०० २.३०, ५.३० वाजता दाखले जातील. दयानंद राव यांनी सूत्रसंचालन केले. निखिल देसाई यांनी आभार मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment