Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 1 May 2008

...तर ८ मे रोजी गोवा अंधारात

वीज कर्मचाऱ्यांकडून संपाचा इशारा
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): गोवा वीज खाते कर्मचारी संघटनेने येत्या ८ मे रोजी संपावर जाण्याची नोटीस सरकारला दिली आहे. वीज खात्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी वरिष्ठ अभियंत्यांची वेतनश्रेणी वाढवली असली तरी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर वेतनवाढप्रश्नी अन्याय झाल्याने तो दूर न केल्यास संपूर्ण गोव्याचा वीजपुरवठा एक दिवस बंद ठेवण्याचा इशारा कामगार नेते राजू मंगेशकर यांनी दिला आहे.
या संपाच्या नोटिशीवरून संघटनेच्या नेत्यांना सरकारने ५ मे रोजी चर्चेसाठी पाचारण केले आहे. गोवा वीज खात्यातील कर्मचारी दोन कामगार संघटनांत विभागले गेले आहेत. या खात्यातील सुमारे ८० टक्के कामगार सरकारी कर्मचारी संघटनेचे सदस्य आहेत, तर चतुर्थश्रेणी कामगार हे "आयटक' शी संलग्नित कामगार संघटनेचे सदस्य आहेत.
माजी वीजमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या काही खास लोकांवर मर्जी राखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील अभियंत्यांच्या वेतनश्रेणीत वाढ करून त्यांना खूष केले होते. हा लाभ खात्यातील सुमारे दीडशे ते दोनशे लोकांना मिळाला आहे. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर हा अन्याय ठरतो. खांबावर चढून आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र वेतनवाढ देण्यात आली नसल्याने त्यांनाही ही वाढ देण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस गणेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अभियंत्यांना देण्यात आलेली वाढीव वेतनश्रेणी अन्य कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात यावी, ही मागणी वेतनश्रेणीतील तफावत दूर करण्याच्या मागणीत असल्याने सरकारने त्याबाबत येत्या २५ दिवसांत निर्णय घेण्याचे मान्य केले आहे.
आता ८ रोजी संपावर जाण्याचा निर्णय हा "आयटक'प्रणीत कामगार संघटनेने घेतला असून त्यांची ५ रोजी सरकारशी चर्चा असून त्यात काय निर्णय घेतला जातो, यावरून पुढील कृती ठरणार आहे.

No comments: