रुडी यांच्याहस्ते महिला शिबिराचा समारोप
डिचोली, दि. २७ : लोकप्रिय अर्थसंकल्प सादर केल्याच्या तोऱ्यात असलेल्या कॉंग्रेस सरकारचे जीवघेण्या महागाईमुळे देशभर हसे झाले आहे, त्यामुळे जनता सार्वत्रिक निवडणुकीची वाट पाहत आहे , असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते राजीवप्रताप रुडी यांनी भाजप पहिला मोर्चाच्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी मुळगाव - डिचोली येथे केले.
भारतीय जनता पक्षाने महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाविषयी गंभीररीत्या विचार केला असून, संघटनेत त्यांना आत्तापासूनच आरक्षित जागा दिलेल्या आहेत. त्यामुळे महिलांचे राजकीय भविष्य भाजपतच आहे. त्यामुळे महिला मोर्चाने राजकारणात पुढे यावे, असे आवाहन श्री रुडी यांनी केले.
यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर समारोपप्रसंगी उपस्थित होते. गोव्याच्या समस्या व भारतीय जनता पक्षाचे योगदान या विषयांवर बोलताना त्यांनी वाढलेल्या महागाईस पूर्णपणे कॉंग्रेसचे निष्क्रिय सरकारच जबाबदार आहे असे सांगून, भाजपने कमी दरात जीवनावश्यक वस्तू विकून सरकारला एक चांगले उदाहरण घालून दिले आहे, पण बेमुर्वत सरकार कुठलीही चांगली गोष्ट करण्याच्या मनःस्थितीतच नाही असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे, गोव्याचे संघटन प्रभारी श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस व महिला प्रभारी गोविंद पर्वतकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. मुक्ता नाईक, सरचिटणीस सौ. वैदहि नाईक उपस्थित होत्या.
प्रशिक्षण शिबिरात चांगली सत्रे झाल्यामुळे सर्व महिला उत्साहात होत्या. रोहिणी परब यांनी समारोप कार्यक्रमांतर्गत आभार मानले व शेवटी वन्दे मातरम्ने दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराची सांगता झाली.
Sunday, 27 April 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment