Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 29 April 2008

बसवाहतूकदारांतील वाद गंभीर होण्याची शक्यता

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): प्रवासी मिळवण्याच्या वादातून पणजी शहर बसवाहतूकदार व बाहेरील बसमालक यांच्यातील तिढा अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाहतूक खात्याने यासंबंधी काढलेल्या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करून शहरी बसमालकांवर अन्याय झाल्यास तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शहरी बस संघटनेचे अध्यक्ष मायकल डिसोझा यांनी दिला आहे. माशेल, कुंभारजुवे,चिंबल, म्हापसा आदी शहराबाहेरील बसेस पणजी कदंब बसस्थानकावरून शहरी भागातील प्रवाशांना बेकायदा घेत असल्याने त्याचा थेट परिणाम शहरी बसेसवर होतो, असा आरोप डिसोझा यांनी केला आहे. दरम्यान, शहरातील प्रवाशांना पणजी बसस्थानकावर उतरवून त्यांना परत शहरी बसेसने पणजी बाजार किंवा पुढे जाण्यास वेगळे पैसे मोजावे लागतात व त्यांना अधिक भुर्दंड सहन करावा लागतो. तथापि, या बसेसनी बसस्थानकावर न येता थेट पुढे जाण्याचे ठरलेले आहे. बसस्थानकावर प्रवाशांना उतरवण्यासाठी या बसेस बसस्थानकावर येतात व शहरी प्रवाशांना घेऊन बाजारात जातात, असाही आरोप केला जात आहे.
दरम्यान, यासंबंधी वाहतूक खाते,मुख्य सचिव, वाहतूकमंत्री आदींना निवेदने सादर करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने संघटनेने अद्याप कडक पाऊल उचलले नाही, असे सांगून या बसेसना वेळीच आवर घालावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments: