पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): सोणये-तुये येथील नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या सिद्धी साई मंदिरात येत्या १ मे रोजी साई उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे.
येत्या गुरुवार १ मे रोजी दुपारी १ ते ३ यावेळेत महाप्रसाद होईल. संध्याकाळी ५ वाजता कोल्हापूर केरवडे येथील पटबीर देवालय ग्रामस्थ मंडळातर्फे "हरिपाठ' हा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री ८.३० वाजता मुंबईतील सुप्रसिद्ध जादूगार जी. मनोहर व सागर यांचे जादूचे व बोलक्या बाहुल्यांची तुफान जुगलबंदी होणार आहे.
धारगळ दोन खांब येथून आत गेल्यानंतर आरोबा गावचा पुल ओलांडल्यावर तुये गाव लागतो. तुये सोणये येथे मुख्य रस्त्याला टेकूनच उभारण्यात आलेल्या सुंदर व टुमदार अशा साईमंदिरात सिद्धी साई दिंडी (परळ-मुंबई) यांच्या विद्यमाने सुमारे साडेपाच फुटांची देखणी व शिर्डीस्थीत साईबाबांची अनुभूती देणारी मूर्ती स्थापण्यात आली आहे. १३ जानेवारी २००६ रोजी परळी मुंबईहून सुमारे ५०० साईभक्तांनी ही मूर्ती मुंबई ते शिर्डी येथे पदयात्रेने साईबाबांच्या भेटीला नेली. त्यानंतर २९ साईभक्तांनी प्रथम प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाची दर्शन भेट घेऊन १ फेब्रुवारी २००६ ते १८ फेब्रुवारी २००६ या कालावधीत मुंबई ते गोवा पदयात्रेने साईंची ही मूर्ती गोव्यात आणली. ३० एप्रिल २००६ ते ४ मे २००६ रोजी साईमुर्तींच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला. साई उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धी साई दिंडीचे संस्थापक गणेश पालेकर, अध्यक्ष मधुकर पालयेकर, सचिव सुभाष कवठणकर व खजिनदार सुरेश नार्वेकर यांनी केले आहे.
Tuesday, 29 April 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment