Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 1 May 2008

कामगारदिनीच त्यांच्यावर नोकरी गमावण्याची पाळी

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): बांबोळीतील "गोमेकॉ' इस्पितळात गेल्या पाच ते सात वर्षांपासून "स्वीपर' व सेवक म्हणून कंत्राटी सेवेत असलेल्या कामगारांना कामगारदिनीच दिवशीच घरी पाठवण्याची "नोटीस' जारी करण्यात आल्याने त्यांच्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
गोवा आरोग्य महाविद्यालयात गेल्या पाच ते सात वर्षांपासून स्वीपर, सेवक, सुरक्षा रक्षक आदी पदांवर कंत्राटी सेवेत असलेल्या सुमारे २५० कामगारांना आता सरकारने घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरू केलेल्या गोवा कंत्राटी कामगार भरती सोसायटी अंतर्गत नेमलेल्या कामगारांचाही यात समावेश आहे. या कामगारांना घरी पाठवून त्याठिकाणी नव्या कामगारांची कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्यासाठी गोवा आरोग्य महाविद्यालयातर्फे जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. कंत्राटी नोकर भरतीचा लाभ उठवून कामगारांना सतावण्याचे सत्र सध्या सरकारने सुरू केले असून हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

No comments: