Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 27 April 2008

गोव्यात सिद्धगिरी ज्ञानपीठ व अनोखे संग्रहालय साकारणार

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): गोव्यात कासरपाल अस्नोडा येथे सिध्दगिरी ज्ञानपीठ आणि गोव्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना भारतीय संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी अनोखे संग्रहालयाची उभारणी केली जाणार असल्याची माहिती प.पू अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी आज दिली.
ते आज पणजीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर तसेच अन्य भक्तगण उपस्थित होते. या ज्ञानपीठात गुरुकुल पद्धतीने प्राथमिक शिक्षण दिले जाणार असून या विद्यालयातील विद्यार्थ्यांना संगीत, नाटक तसेच अध्यात्माचेही शिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी दिली. या सिध्दगिरी ज्ञानपीठासाठी कोमुनिदादची सुमारे १ लाख २० हजार चौरस मीटर जागा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले. तर थिवी येथे ट्रस्टच्या मालकीची असलेल्या २० हजार चौरस मीटर जागेवर हे अनोखे संग्रहालय उभारले जाणार आहे.
शिक्षक काय शिकवतात, त्यापेक्षा शिक्षक काय करतात, हे मुले जास्त शिकतात, असे म्हणून गुरुकुल पद्धतीने देण्यात येणाऱ्या या शिक्षणाला महत्त्व दिले जाणार आहे. पाठ्यपुस्तकात असलेल्या काही चुकांसंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना श्री स्वामी म्हणाले, वाईटातून चांगले कसे शिकवावे हे शिक्षकाचे कौशल्य असते.
श्री क्षेत्र सिद्धगिरी' काणेरी कोल्हापूर येथे मुख्य मठ असून याला हजार वर्षापासूनची सांस्कृतिक, धार्मिक तसेच आध्यात्मिक परंपरा लाभली आहे. सर्व धर्मांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी "सिद्धगिरी म्युझियम' हा अभिनव असा प्रकल्प आहे. "भारतीय ग्रामीण संस्कृती' हा या संग्रहालयाचा मुख्य गाभा आहे. ग्रामीण भारत कशा समृद्ध होता, ग्रामीण भागातील ग्रामवासियांच्याकडून ग्रामवासीयांच्या गरजा व अपेक्षा कशा भागवल्या जात होत्या, याचे जिवंत दर्शन या प्रकल्पातून घडवले आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशा या भारतीय ग्रामीण संस्कृतीची नव्या पिढीला ओळख व्हावी, माहिती व्हावी, तिची जपणूक आणि संवर्धन करता यावे, निर्मळ जल, निर्भेळ अन्न आणि निराआलस्य कष्ट तसेच स्वावलंबी सहज सुंदर ग्रामीण, जीवनांवर प्रीती जडावी या उदात्त हेतूने हा प्रकल्प साकारला आहे. अशा प्रकारचा हा उपक्रम महाराष्ट्रातलाच नव्हे त संपूर्ण देशातील पहिलाच उपक्रम आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments: