पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रीय महामार्ग १७ व ४ (अ) चे राज्य सरकारतर्फे चौपदरीकरण करण्याचे जे नाटक चालवले आहे, हा त्यांच्या स्वार्थी राजकारणाचा एक भाग असल्याचा सनसनाटी आरोप "सेव्ह गोवा फ्रंट'च्या एका नेत्याने केला आहे. कारण मुळातच, राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाची बाब केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते.
चर्चिल यांचे हे प्रयत्न केवळ लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी सुरू आहेत. कारण, गोव्यातील दोन्ही राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणाची पूर्ण प्रक्रिया भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात आली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने कार्यन्वित केलेल्या राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेअंतर्गत या दोन्ही महामार्गांच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे. चर्चिल यांनी केंद्र सरकारकडे ही योजना मार्गी लावण्यासाठी आपली ताकद वापरावी, असा सल्लाही या नेत्याने दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो त्यामुळे महामार्गाचे काम केंद्र सरकार मार्गी लावणार आहे. चर्चिल यांनी राज्यातील अंतर्गत रस्त्यांचे विस्तारीकरण व डांबरीकरणाकडेच लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे टप्पा तीन (ब) या अंतर्गत गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग १७ व ४ (अ) चे चौपदरीकरण करण्यासाठीची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याप्रकरणी "विल्बर स्मिथ असोसिएटस्' या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. महामार्ग क्रमांक ४(अ) चा अहवाल या कंपनीने केंद्राला सादर केला असून महामार्ग क्रमांक १७ चा अहवाल लवकरच केंद्राला सादर करण्यात येणार आहे.
चर्चिल यांनी हे काम प्राधान्यक्रमाने करण्यासाठी राज्य सरकारला परवानगी देण्याची मागणी केंद्राकडे करण्याचा जो निर्णय आहे तो अजिबात मान्य न होण्याचीच जास्त शक्यता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. चर्चिल यांनी या चौपदरीकरणासाठी दोन हजार कोटी रुपयांचा खर्च होईल असे जे म्हटले आहे त्यालाही आक्षेप घेण्यात आला आहे. चर्चिल यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम खाते काढून घेण्याची मागणी आघाडीतील अन्य घटक पक्षांनी केल्याने केवळ आपण काहीतरी मोठ्ठे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आव आणून या खात्यावरील आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
-------------------------------------------------
अंदाजित खर्च १३५६.१६ कोटी रु.
विशेष म्हणजे केंद्र सरकारने या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणासाठी तयार केलेला अंदाजित खर्च हा सुमारे १३५६.१६ कोटी रुपये आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ (अ)- ४४९.८८ कोटी व राष्ट्रीय महामार्ग १७ -९०६.२८ कोटी अशी विभागणी करण्यात आली आहे व त्यात पाच पुलांचाही समावेश आहे. दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांनी हा रस्ता "बांधा, वापरा व परत करा' या पद्धतीवर बांधण्याचा निर्णय घेतल्याने ते काम राज्य सरकाराअंतर्गत करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगण्यात आले.
-------------------------------------------------
Wednesday, 30 April 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment