पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): मॉडेल होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वावरणाऱ्या निरुक्ताला कोणी आणि का फसवले, याचा शोध घेण्यास गुन्हा अन्वेषण विभागाला अद्याप यश आलेले नाही. मॉडेल होण्याचे हे खूळ तिच्या मनात कोणी भरवले, याचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. हे करताना फोंडा पोलिसांच्या सावलीतून बाहेर येऊन स्वतंत्ररीत्या तपास आणि शोधकार्य करावे लागेल तेव्हाच या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गुन्हा अन्वेषण विभागाला शक्य होईल, असे दिसते.
गुन्हा अन्वेण विभागाकडे या प्रकरणाची सूत्रे सोपविल्यानंतर या प्रकरणी चर्चेचा केंद्रबिंदू असलेल्या एका महाभागाचे धाबे सध्या चांगलेच दणाणले असल्याची जोरदार चर्चा सध्या फोंड्यात सुरू आहे. हे प्रकरण म्हणजे नुसती आत्महत्या असून त्यामागे कोणतेच गूढ नाही असा प्रचार करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही त्याने आपल्या काही लोकांच्या सहकार्याने चालवल्याची चर्चा आहे. फोंडा पोलिसांनी आधीपासूनच हे प्रकरण म्हणजे नुसती आत्महत्या आहे असे भासवून तपासकामात केलेली दिरंगाई लक्षात घेता गुन्हा अन्वेषण विभागाला या प्रकरणाच्या मूळाशी जाण्यासाठी तपासाचा वेग आणि क्षमता वाढवावी लागेल. केवळ हाताखालच्या पोलिस शिपायांना फोंड्यात चौकशीसाठी पाठवून या प्रकरणावर प्रकाश पडणार नाही.
दुर्दैवी निरुक्ताने एका स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी निरुक्ताचे वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढण्यात आले होते. हे फोटो तिने आपल्या मित्रांनाही दाखवले होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, ९ मार्च रोजी निरुक्ताने आत्महत्या केल्यानंतर तिचे हे फोटो गायब करण्यात आले होते. याचा सुगावा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला लागताच हे फोटो तिच्या कुटुंबीयांकडून मागवण्यात आले आहे. हे फोटो पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ते कोणी, कोठे व का काढले, याचा शोध लागणार आहे.
Wednesday, 30 April 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment