Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 29 April 2008

चौपदरीकरणाच्या प्रस्तावास मान्यता

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): पत्रादेवी ते पोळे या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील १३९ किलोमीटरचा रस्ता व अनमोड ते पणजीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग ४ (अ) चा ६९ किलोमीटरचा रस्ता (बांधा, वापरा व परत करा) या "बुट' पद्धतीवर उभारण्याच्या प्रस्तावावर आज सर्वपक्षीय बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या योजनेवर सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याबाबतची घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी केली.
आज पर्वरी सचिवालयात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरेंद्र फुर्तादो, संसदीय सचिव नीळकंठ हळर्णकर, उपसभापती मावीन गुदीन्हो व मुख्य सचिव जे. पी. सिंग हजर होते. संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना श्री.आलेमाव यांनी या बैठकीत घेतलेल्या निर्णयासंबंधीची माहिती दिली. सा. बां. खात्याचे मुख्य अभियंते श्री. वाचासुंदर यावेळी हजर होते. चर्चिल यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, राज्य सरकारतर्फे लवकरच सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून येत्या जून महिन्यात होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात या प्रस्तावासंबंधीचा ठराव मंजूर करून घेतला जाणार आहे. हा ठराव केंद्र सरकारला कळवण्यात येणार असून केंद्राच्या मान्यतेनंतर येत्या वर्षात हे काम सुरू करून चार वर्षांच्या कार्यकाळात ते पूर्ण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
विद्यमान महामार्गाचे विस्तारीकरण करून चौपदरी केल्यास स्थलांतराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात जाणवणार नाही. वेर्णा, काणकोण तसेच काही इतर भागात किमान दहा ते पंधरा कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असल्याची माहिती आलेमाव यांनी दिली. कोलवाळ, मांडवी, जुवारी, तळपण व गालजीबाग अशा पाच नव्या पुलांचा यात समावेश असून सुमारे दोन हजार कोटी रुपये अंदाजित खर्च या योजनेवर होणार आहे. हा प्रकल्प "बुट' पद्धतीवर राबवण्यात येणार असला तरी त्यासाठी गोव्यात नोंदणी झालेल्या वाहनांवर टोल आकारला जाणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
केंद्र सरकारच्या टोल पद्धतीचा अभ्यास केला जाणार असून हे पैसे वसूल करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने कोणता मार्गा अवलंबिता येईल,याबाबत स्वतंत्रपणे विचार केला जाणार असल्याची माहितीही आलेमाव यांनी दिली.

No comments: