पणजी, दि. २ (प्रतिनिधी): वाहतूक पोलिसांनी कालचे रेकॉर्ड मोडताना काळ्या काचांविरोधात आरंभलेल्या मोहिमेअंतर्गत आज (शुक्रवारी) ८३६ वाहन धारकांना दंड ठोठावला. काल (गुरुवारी) सुमारे ७०० जणांना दंड करून काळे फिल्मिंग काढण्यात आले होते.
या धडक मोहिमेमुळे, फिल्मिंग केलेल्या वाहन धारकांनी आज स्वतःहून वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून वाहनाच्या फिल्मिंगची चाचणी करून घेतली. वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या काचेतून ७० टक्के तर खिडकीच्या काचेतून ५० टक्के प्रकाशझोत जायला हवा, असा नियम आहे. ज्या वाहनांची फिल्मिंग नियमबाह्य होते अशांनी स्वतःहून आपल्या वाहनांचे फिल्मिंग काढून टाकल्याची माहिती वाहतूक पोलिस उपअधीक्षक जी. बी. प्रभू म्हापणे यांनी दिली.
मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी पणजीत २६३, म्हापसा ८१, फोंडा १२५, मडगाव १३४, वास्को १४५ तर कुडचडे १६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर स्वतः पोलिस उपअधीक्षक म्हापणे यांनी २२ वाहनांवर कारवाई केली.
काही पोलिसांनी शुक्रवारी यंत्राद्वारे चाचणी न करताच फिल्मिंग काढायला सुरुवात केल्याने ते वादाला निमंत्रण ठरले. पणजीत शेजारच्या राज्यातून आलेल्या पर्यटकांच्या वाहनांवर कारवाई करण्यात आल्याने अनेकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे कोणत्याही वाहनाच्या फिल्मिंगची चाचणी न करता, त्यावर कारवाई करून नये, असा आदेश पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी पोलिसांना दिला.
Saturday, 3 May 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment