दोन लाखांचे डिझेल
असलेले २९ पिंप जप्त
तीन होड्या ताब्यात
तीन संशयितांना अटक
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): आखाडा जुने गोवे येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या डिझेलची तस्करी करणाऱ्या होड्यांवर गुन्हे अन्वेषण विभागाने आज सकाळी छापा टाकून २९ पिंपांमधून सुमारे २ लाख रुपये किमतीचे सहा हजार लिटर डिझेल आणि तीन होड्या जप्त केल्या.
या प्रकरणात अनिबाल फर्नांडिस (३७), गोपाळ नाईक (३१) व देविदास सावंत (४२) (सर्व रा. आखाडा) यांना भारतीय दंड संहितेच्या २८५ व जीवनाअवश्यक वस्तू कायदा कलम ७ नुसार अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता या विभागाचे उपअधीक्षक सेराफीन डायस यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. या छाप्यामुळे मांडवी नदीमार्गे खनिज मालाची वाहतूक करणाऱ्या बार्जच्या टाक्यांतील डिझेलची चोरी करून त्याचा काळाबाजार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बार्ज घेऊन जाणारे आणि डिझेल चोरी करणाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत उघड झाली आहे.
बार्ज सुरू असतानाच त्याच्याशी समांतर छोटी होडी सुरू ठेवली जायची. त्यानंतर बार्जच्या टाकीमध्ये पाईप टाकून पंपव्दारे बार्जमधून हे डिझल होडीत असलेल्या पिंपामध्ये भरले जायचे. त्यानंतर जेवढे डिझेल काढले जात, त्याचे पैसे त्याचवेळी त्या बार्जच्या कॅप्टनला दिले जात. पोलिसांनी डिझेल काढण्यासाठी वापरला जाणारा पंपही जप्त केला आहे.
आज करण्यात आलेल्या या कारवाईत गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक मंगलदास देसाई व उपअधीक्षक डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीण वस्त, निरीक्षक रुपेंद्र शेटगावकर व निरीक्षक देवेंद्र गाड यांनी भाग घेतला.
-----------------------------------------
अशी व्हायची 'हाथ की सफाई'
मांडवी नदीतून अरबी समुद्रात खनिजाची वाहतूक करणाऱ्या बार्जमधून हे डिझेल काढले जायचे. बार्जच्या टाक्यांमधून डिझेल काढण्यापूर्वी एका पिंपाची बोली लावली जायची. सर्वाधिक बोली लावणाऱ्यालाच बार्जच्या टाक्यांमधील डिझेल उपसण्याची परवानगी दिली जायची. एक पिंप डिझेलसाठी सुमारे ६ हजार ३०० रुपये मोजले जायचे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानंतर एका पिंपामागे ३६ लीटर डिझेलचा एक कॅन बार्जची वाहतूक करणाऱ्याला मोफत दिला जायचा.
-----------------------------------------
Wednesday, 30 April 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment