वास्को, दि.२७ (प्रतिनिधी): सांखवाळ येथे राहणारा एल्टन लोबो (१५) हा आपल्या इतर तीन अल्पवयीन मित्रांबरोबर आंघोळीसाठी जुवारी धरणावर आंघोळीसाठी गेला असता त्याचे बुडून निधन झाले. आपला मित्र बुडाल्याचे समजल्याने घाबरलेल्या इतर तीनही मित्रांनी सदर गोष्ट दा ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र काल उशिरा रात्री ही घटना उघडकीस आल्यानंतर आज सकाळी एल्टनचा मृतदेह त्याठिकाणी पाण्यातून वर काढण्यात आला.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कुठ्ठाळी येथील अवर लेडी ऑफ पर्पेच्युअल हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणारा एल्टन हा आपल्या इतर तीन मित्रांबरोबर (वय सुमारे १३ ते १५) काल दि. २६ रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास बिट्स पिलानीसमोर असलेल्या जुवारी धरणावर आंघोळ करण्यासाठी गेला होता. काही वेळातच एल्टन अचानक धरणाच्या पाण्यात बुडाला. हा प्रकार त्याच्याबरोबर असलेल्या तीनही मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी घाबरून येथून पळ काढला. आपल्या बरोबर आलेला मित्र बुडाल्याने भीतीपोटी त्यांनी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली. मात्र जसा उशीर होत गेला व एल्टन घरी परतला नाही, तेव्हा त्याच्या कुटुंबाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. वेर्णा, वास्को व सांखवाळ अशा ठिकाणी शिकणाऱ्या त्याच्या बरोबर गेलेल्या मित्रांशी एल्टनच्या थोरल्या बहिणींनी उशिरा रात्री चौकशी केली, तेव्हा त्या मित्रांच्या तोंडून सत्य बाहेर आले. एल्टन जुवारी धरणात आंघोळ घेत असताना बुडाल्याचे समजताच वेर्णा पोलिसांना यांची माहिती देण्यात आली. रात्रीच्या वेळी येथे शोध घेणे कठीण झाल्याने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वेर्णा पोलिसांनी अग्निशामक दलाच्या साहाय्याने या ठिकाणी शोध घेतला असता त्यांना एल्टनचा मृतदेह आढळून आल्यानंतर तो पाण्यातून वर काढण्यात आला. एल्टन याची आई बहारिनला असून, वडील व थोरली बहिण सांखवाळ येथे राहातात.
वेर्णा पोलिसांनी यावेळी एल्टनच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो बांबोळी येथील गोमेकॉच्या शवागृहात पाठवून दिला. उद्या त्याच्या मृतदेहावर शवचिकित्सा करण्यात येणार असल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली. वेर्णा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक जिवोबा दळवी पुढील तपास करीत आहेत.
Sunday, 27 April 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment