Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 15 February 2008

फेररचनेनुसारच लोकसभा
व विधानसभा निवडणुका

नवी दिल्ली, दि. १४ - झारखंड आणि पूर्वेकडील चार राज्ये वगळता देशभर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या नव्या परिसीमननुसार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून याबाबत लवकर अधिसूचना जारी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ंपंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
देशभरात निवडणुकीसाठी परिसीमन लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून याबाबत राष्ट्रपतींनी त्वरीत अधिसूचना जारी करण्यासाठी हा निर्णय त्यांना कळविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रियरंजन दासमुंशी यांनी दिली. परिसीमननुसार आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका घेण्यात हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
परिसीमन आयोगाचे नवे परिसीमन आदेश लागू करण्याबाबत तारीख निश्चित करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटने मंजुरी दिली. १९७६ च्या परिसीमन आदेशाच्या जागी नवा आदेश लागू करण्याबरोबर १९५० च्या लोकप्रतिनिधी कायद्यात संशोधन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. नव्या अध्यादेशाद्वारे झारखंड राज्य हे नव्या परिसीमन आदेशाच्या परिघातून वेगळे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झारखंडमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या जागा पहिल्यापेक्षा कमी होत आहेत. य़ाशिवाय आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालॅंडही सध्या तरी परिसीमनच्या कक्षेत येणार नाही, असेही दासमुंशी यांनी स्पष्ट केले.
या व्यतिरिक्त भारताशी जोडणाऱ्या आशियाई देशातील रस्ते बांधण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. भूतान, बांग्लादेश, नेपाळ या देशांशी भारताचे दळणवळण मजबूत करण्यासाठी आशियाई महामार्गावरील महामार्ग क्र २ आणि महामार्ग क्र ४८ यांच्या मार्गामध्ये संशोधन करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. यामुळे आशियाई देशांबरोबर व्यापार आणि पर्यंटन वाढवणे शक्य होणार असल्याचे दासमुंशी यांनी सांगितले.

No comments: