Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 15 February 2008

पहिला अर्ज कुंकळ्ळी पालिकेत!कुंकळ्ळी येथील आमच्या प्रतिनिधीने पाठविलेल्या माहितीनुसार मान्यताला वास्तव्य दाखला मिळवून देण्याचा प्रथम प्रयत्न कुंकळ्ळी नगरपालिकेत झाला होता पण तेथील मुख्याधिकारी आग्ऩेलो फर्नांडिस यांच्या दक्षतेमुळे तो फसला. मिळालेल्या माहितीनुसार माजी मामलेदार शिवानंद कदम यांचे पुत्र भूषण यांनी पोयराबांध कुंकळ्ळी येथील एक बांधकाम ठेकेदार शेख गनी यांची भेट घेऊन त्याच्याकडून मान्यताच्या वास्तव्य दाखल्यासाठी ना हरकत दाखला घेतला व कुंकळ्ळी पालिकेत सदर दाखल्यासाठी अर्ज केला पण मुख्याधिकारी आग्नेल यांच्या लक्षात ती बनवेगिरी आली व त्यांनी तो दाखला नाकारला. ते पाहून कदम यांनी सदर अर्ज तेथेच फाडून टाकला पण त्या अर्जाची नोंद पालिका दप्तरात झालेली आहे. पण जे कुंकळ्ळीत शक्य झाले नाही ते त्यांनी मडगावात साध्य केले पण तेही शेवटी अल्प घटकेचे ठरले.
मान्यताला निवासी दाखला
देणारा तलाठी निलंबित

मडगाव, दि.१४ (प्रतिनिधी) - गोव्यातच केवळ नव्हे तर साऱ्या देशभर गाजत असलेल्या अभिनेता संजय दत्त व मान्यता यांच्या गोव्यात झालेल्या विवाह नोंदणी प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या सासष्टी मामलेदार कचेरीतील तलाठी प्रशांत कुंकळकर याला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक यांनी आज सायंकाळी हा निलंबनाचा आदेश जारी केला. पुढील आदेशापर्यंत मुख्यालय सोडून जाऊ नये असे या आदेशात पुढे म्हटले आहे.
मान्यता ऊर्फ दिलनशिल अहमद शेख हिला तिचे वास्तव्य गोव्यात नसताना बनावट पत्त्यावर विसंबून कुंकळकर याने विवाह नोंदणीसाठी वास्तव्य दाखला जारी केला व त्यांतून मोठा विवाद खडा झाल्यानंतर काल सासष्टीचे मामलेदार परेश फळदेसाई यांनी सदर तलाठ्याला कारणे दाखवा नोटिस जारी केली होती पण ती नोटिस त्याने स्वीकारली नाही की स्पष्टीकरणही दिले नाही उलट आपण केले ते सारे कायदेशीर असल्याची उद्दामपणाची भाषा तो करू लागला.
या प्रकरणी जिल्हा धिकारी जी. पी. नाईक यांनी आज मामलेदारांकडे या एकंदर प्रकरणाचे स्पष्टीकरण मागितले असता मामलेदारांनी त्यांना सविस्तर अहवाल सादर केला व त्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी सदर तलाठ्याला निलंबित केले व या आदेशाच्या प्रती उपजिल्हाधिकारी, लेखा उपसंचालक, दक्षता खाते यांना पुढील कारवाईसाठी पाठविल्या .
वरिष्ठांचा आदेश न जुमानणे, नोटिस स्वीकारण्यास नकार देणे व बेशिस्तीचे वर्तन करणे असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.
आता बाहेर येत असलेल्या माहितीनुसार मान्यता हिने आके येथील कल्याण या इमारतीत आपण राहत असल्याचे नमूद केलेले असून तो पुरावा मानून तलाठ्याने तिला वास्तव्याचा दाखला दिला . त्याबाबतचा अर्ज देण्यासा़ठी वा दाखला नेण्यासाठी सुध्दा ती व्यक्तिशः तलाठ्याकडे आली नव्हती ही यांतील नोंद घेण्यायोग्य गोष्ट मानली जात आहे.
तिने वास्तव्यासाठी ज्या इमारतीचा उल्लेख केला आहे ती काणकोणचे निवृत्त मामलेदार शिवानंद कदम यांच्या मालकीची असून त्यांचे चिरंजीव भूषण कदम यांनी सदर दिलशन ही आपली मानलेली बहीण असल्याचे आपल्या ओळखपत्र दाखल्यात म्हटले आहे.
दरम्यान तलाठ्यावर कारवाई झालेली असली तरी संजय दत्त व मान्यता यांच्या झालेल्या विवाह नोंदणीचे काय हा प्रश्र्न रहातोच. सदर वास्तव्य दाखला जरी बेकायदेशीर ठरला तरी त्याची अधिकृत माहिती जोपर्यंत त्यांच्याकडे येत नाही तोपर्यंत ते या प्रकरणी काहीच करू शकत नाही असे मानले जाते.
आणखी एका वृत्तानुसार या प्रकरणातील नवरदेव संजय दत्त काल संध्याकाळपर्यंत गोव्यात होता पण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाल्याचे पाहून त्याने मुंबई गाठल्याचे समजते.

No comments: