Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 14 February 2008

राज ठाकरे यांना अटक, जामिनावर सुटका
तीन दिवसानंतर राजनाट्याची अखेर

मुंबई, दि. 13 - होणार, होणार, आज होणार, उद्या अटक होणार, अशी गेले तीन दिवस उठणा़ऱ्य़आ अफवांना आज अखेर दुपारी सव्वा चार वाजता मुंंबई पोलिसांनी पूर्णविराम देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अटक केली. राज ठाकरे यांना अटक झाली नाही तोच मुंबईसह महाराष्ट्रात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात राज ठाकरे यांना विक्रोळी येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 15 हजार रुपयांच्या जामीनावर सोडून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
राज ठाकरे यांची सुटका होताच विक्रोळीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि गेल्या दोन आठवड्यात राज ठाकरे हिरो बनले. शिवसेनेला शह देण्यासाठी राज ठाकरे यांनी पद्धतशीरपणे रचलेल्या व्यूहरचनेला राज्य सरकारने मदत केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. ते रहात असलेल्या दादर येथील कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी कालपासूनच पोलिसांचा गराडा पडला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्र सरकारने निमलष्करी दल, धडक कृती दल राज्यात पाठवून दिले होते. पोलीस बंदोबस्ताबरोबरच हे दल शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. याशिवाय विक्रोळी न्यायालय परिसरातही पोलिसांचा अत्यंत कडेकोट बंदोबस्त होता.
दुपारी एक वाजता पोलीस राज ठाकरे यांच्या घरी गेले. त्यांचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर त्यांना ताब्य़ात घेण्यात आले आणि त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाली. अटक करण्यापूर्वी विक्रोळीकडे जाणाऱ्या महामार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्य़ात आला होता. शिवाय हा रस्ता मोकळा राहील याची खबरदारीही मुंबई पोलिसांनी घेतली होती. उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील हे मुंबईत आल्यानंतरच त्यांना अटक करून न्यायालयात नेण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील मंत्रालयात आले. त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिका़ऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर दुपारी सव्वा चार वाजता पोलीस उपायुक्त सुनील फडतरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेले आणि राज यांना रीतसर अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला यांनी त्यांच्या हातावर दही आणि साखर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांचे सासरे मोहन वाघ य़ांनी दिली. राज्यात परीक्षांचे वातावरण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंदोलनाचा फ़टका बसू नये, यासाठी शांततेचे आवाहन राज ठाकरे यांनी केल्याचे मोहन वाघ यांनी सांगितले.
ठाकरे यांना पोलीस बंदोबस्तात पोलीस व्हॅनमध्ये बसविण्यात आले. यावेळी प्रसिद्धीमाध्यमांनी त्यांना गराडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसिद्धीमाध्यमांशी त्यांना बोलण्यास मनाई केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मोहन वाघ यांनी राज यांनी कोणताही गुन्हा केला नसल्याचे सांगितले. ठाकरे यांना चागंल्या कामासाठी अटक होत आहे. त्यामुळे कुटुंबिय आणि सुज्ञ जनता त्यांच्याबरोबर आहे, असेही वाघ म्हणाले.
मनसेचे प्रवक्ते शिरीष पारकर यांनी राज्यात राज ठाकरे यांच्या अटकेनंतर निर्माण होणाऱ्या प्रक्षोभाला मनसे जबाबदार नसल्याचा युक्तीवाद केला. राज्यात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक अटक झाल्याने आता जो प्रक्षोभ रस्त्यावर दिसतो आहे, ती उत्स्फुर्त प्रतिक्रिया आहे, असे पारकर यांनी सांगितले. लोकांच्या मनात खदखदणारा गेल्या 15-20 वर्षाचा राग यावेळी बाहेर पडत आहे, असेही पारकर म्हणाले. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज्य सरकारने उशीराने कारवाई करत निष्पाप जनतेला वेठीस धरल्याचा आरोप केला.
सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास मोठया बंदोबस्तात राज ़ठाकरे यांना विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यानी त्या परिसरात गर्दी केली होती. तब्बल दीड तास सुरू असलेल्या युक्तीवादादरम्यान पोलीसांनी राज ठाकरे यांना कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. त्याला राज ठाकरे यांनीही सहमती दर्शवली. तेव्हा राज ठाकरे यांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज कोर्टाला सादर केला. न्यायाधीश शर्मा यांनी त्यांचा जामीन अर्ज मंजूर करून राज यांना 15 हजार रुपयांच्या जामीनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राज ठाकरे यांना न्यायालयाने जामीनावर मुक्त केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे झिंदाबादच्या घोषणा देत त्यांची विजयी मिरवणूक काढली.
दरम्यान, राज ठाकरे यांना अटक होतात मुंबईत मोठ्या प्रमाणावर बसेसची नासधूस करण्यात आली. दादर, विक्रोळी, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव चेंबुर, आदी ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली. याशिवाय या भागातील लोकांनी आंदोलनाला घाबरून आपली दुकाने अगोदरच बंद केली. मात्र सर्वाधिक उद्रेक नाशिक येथे झाला. मुबंई आग्रा महामार्गावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. त्यात एकाचा मृत्यु झाला. एस. टी बसेस जाळण्याचा काही समाजकंटकांनी प्रयत्न केला.
कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, या भागातही मनसेच्या कार्यकर्त्यांनी अटकेचा निषेध करण्यासाठी आंदोलने केली. रत्नागिरी, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागातही सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

No comments: