एमपीटीविरोधात वास्कोत कडकडीत बंद
वास्को, दि.११ (प्रतिनिधी) - मुरगाव पोर्ट ट्रस्टतर्फे होत असलेल्या कथित सतावणुकीच्या निषेधार्थ मुरगाव बचाव अभियानतर्फे पुकारण्यात आलेल्या वास्को बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. सदर अभियानने मागण्यांचे निवेदन एमपीटीला सादर केले होते. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दिलेल्या वेळेत बंदर व्यवस्थापनाकडून काहीच हालचाली न झाल्याने हा बंद पुकारण्यात आला.
आज सकाळपासून सर्वत्रच या बंदची छाया दिसत होती. वास्कोतील गोम्स मार्ग, बायणा, सडा व इतर भागातील सर्व दुकाने बंद होती. भाजी मार्केट, मासळी मार्केटही बंद होते. सडाहून वास्कोला येणाऱ्या मिनी बसेसही बंद ठेवण्यात आल्या होत्या. खारीवाडा मछिमारी जेटीजवळील सुमारे २०० मच्छीमारी नौका बंद ठेवण्यात आल्या होत्या. एमपीटीच्या जलवाहतुकीचा मार्गही पाण्यात ट्रॉलर व लॉंचेस नांगरून ठेवून बंद पाडला गेला.
यावेळी सडा येथील एमपीटीच्या कार्यालयावर सुमारे ३००० नागरिकांनी मोर्चा नेला. या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी प्रवीण अगरवाल यांच्याविरुध्द घोषणा दिल्या गेल्या व त्यांचा पुतळा तयार करून त्याची विटंबना करण्यात आली. या दरम्यान काही काळ वातावरण तणावाचे बनले, मात्र अनुचित प्रकार घडला नाही. शेवटी अगरवाल यांचे काहीही म्हणणे न ऐकता आंदोलन चालूच ठेवण्याचे जाहीर करून आंदोलक निघून गेले.
या आंदोलनात अनुचित प्रकार घडला नाही मात्र वास्कोहून सडा येथे जात असलेल्या कदंब बसवर दगडफेक करण्यात आली. या बंद व मोर्चामध्ये मुरगावचे आमदार मिलिंद नाईक तसेच पक्षाचे कार्यकर्ते व मुरगाव पालिकेतील नगरसेवकही या मध्ये सामील होते. या बंदमुळे रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट होता.
Tuesday, 12 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment