Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 13 February 2008

नार्वेकर व मडकईकरही दिल्लीत
तोडग्यासाठी मुख्यमंत्र्यांचे सोनियाजींना साकडे

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)- आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आग्रहास्तव सुदीन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याच्या मुद्यावरून कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेले मतभेद विकोपाला गेले असून, कॉंग्रेसचे निरीक्षक हरिप्रसाद सर्वांना योग्य प्रमाणात "प्रसाद'देण्यात अयशस्वी ठरल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी आज दिल्लीत धाव घेतली. कामत यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनवणी केल्याचे वृत्त मिळाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची समजूत काढून स्थानिक राष्ट्रवादी आमदारांना "फॉर्म्युल्या'वर भर देण्यापासून परावृत्त करण्याची मागणी कामत यांनी केल्याचे समजते.
राज्याची आर्थिक स्थितीही बिकट बनल्याने विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी केंद्राकडून अतिरीक्त निधी देण्याची मागणीही त्यांनी या भेटीत केल्याचे वृत्त मिळाले.
मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यापासून दिल्लीवाऱ्या करण्यातच अधिक काळ घालवलेल्या कामत यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली. विद्यमान परिस्थितीतील गेल्यावेळी सरकार वाचवण्यासाठी जो तोडगा दिल्लीत श्रेष्ठींच्या उपस्थितीत काढण्यात आला तो प्रत्यक्षात अमलात आणणे कठीण बनल्याचे यावेळी श्रीमती गांधी यांना सांगण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत सरकारकडे २२ आमदारसंख्या असल्याने मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यास अनेकांचा विरोध असल्याचेही त्यांनी श्रेष्ठींच्या नजरेस आणून दिले. या संकटावर तोडगा काढण्यासाठी केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची समजूत काढून त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्याची विनंती केल्यासच यावर तोडगा निघू शकेल, असेही सांगण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री कामत यांच्याबरोबर पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी बी.के.हरीप्रसाद हे उपस्थित होते.
मुख्यमंत्री कामत यांच्यासह वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर,वित्तमंत्री दयानंद नार्वेकर व मुख्य सचिव जे.पी.सिंग दिल्लीत गेले आहेत. सोनिया गांधी या केवळ मुख्यमंत्री कामत व हरिप्रसाद यांनाच मिळाल्या. दरम्यान, दयानंद नार्वेकर यांच्याकडील वित्त खाते काढून घेण्याचीही अट या तडजोडीत असल्याने त्यांनी आपल्या वित्त खात्याच्या काही मागण्या घेऊन दिल्लीत जाण्यासाठी हीच वेळ निवडली. राज्यातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी केंद्राकडून अधिक आर्थिक मदतीची गरज असल्याचा प्रस्ताव त्यांनी दिल्लीत ठेवण्याचे वृत्त आहे.
वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांना मात्र सोनियांची भेट मिळणे शक्य झाले नसल्याने त्यांच्यावरील टांगती तलवार अजूनही कायम असल्याची खबर आहे. अनुसुचित जमातीचे प्रतिनिधीत्व करणारे मडकईकर हे एकमेव मंत्री असल्याची भूमिका सोनिया गांधी यांच्याकडे मांडण्यासाठी ते दिल्लीत गेले असले तरी त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करणारे कुणीच नसल्याने ते एकाकी पडल्याची खबर आहे.

No comments: